HomeसंपादकीयओपेडChhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते...

Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे!

Subscribe

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सगळ्यात मोठा धक्का छगन भुजबळ यांना बसला. कारण उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी जहाँ नही चैना वहाँ नही रहेना, असे सांगितले, तर आता अजित पवार काहीच बोलत नाहीत हे लक्षात आल्यावर तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, असे बोलून त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे.

महायुतीला राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुपरडुपर बहुमत मिळले. त्यामुळे त्यांच्या सगळ्याच नेत्यांना प्रचंड आनंद झाला. महायुतीला तीन पक्षांचा समुच्चय आहे, जे आमदार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत मूळ पक्ष सोडून आले. आपल्याला मंत्रिपद मिळावे ही त्यांना आशा आहे.

त्यामुळे त्यांच्या मुख्य नेत्यांकडे त्यांचा आग्रह आणि दबाव असणार. त्याचवेळी मागील टर्ममध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समर्थक आमदारांना मंत्रिपदे दिल्यामुळे भाजपमधील नेत्यांंना बाजूला ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी होती. ती दूर करणेही आवश्यक होते. त्यामुळे बरेच दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता.

- Advertisement -

शेवटी एकदाची आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे, पण यात सगळ्यात मोठा धक्का छगन भुजबळ यांना बसला. कारण त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली नाही. त्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले, पण त्यांना का शपथ दिली नाही याविषयी त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे भुजबळांची मोठी कोंडी झाली आहे.

त्यांनी त्यावरून एका भाषणात जहाँ नही चैना वहाँ नही रहेना, अशी विरानी अजित पवारांना ऐकवून दाखवली, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे काय करावे हे भुजबळ यांना कळेनासे झाले आहे. आपण केले काय आणि झाले काय, अशी त्यांची अवस्था झाली आहे. कारण भुजबळ शरद पवार यांच्या खास मर्जीतले नेते होते. छगन भुजबळ हे शिवसेनेतून पुढे आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ते खास मर्जीतले होते.

- Advertisement -

बाळासाहेबांचा त्यांच्यावर फार विश्वास होता. बेळगाव सीमाप्रश्नावरून शिवसेनेचे आंदोलन सुरू असताना छगन भुजबळ भूमिगत होऊन डोक्याचा गोटा करून मातोश्रीवर आले. तेव्हा त्यांना अन्य कुणीही ओळखले नाही, फक्त बाळासाहेबांनी ओळखले, असा किस्सा सांगितला जातो. इतके भुजबळ यांचे बाळासाहेबांशी जिव्हाळ्याचे नातेे होते, पण पुढे मनोहर जोशी त्यांना आपल्यापेक्षा झुकते माप दिले जात आहे, आपल्याला डावलले जात आहे, ही भावना भुजबळ यांच्या मनात वाढीस लागली. त्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि शरद पवार यांच्या छत्रछायेखाली आले.

तळागाळात शिवसेनेचा प्रसार करण्यात भुजबळ यांचे मोठे योगदान होते. विधानसभेत भुजबळ शिवसेनेची बाजू घेऊन एकटे लढत असत. इतके योगदान असूनही आपल्याला डावलले जात आहे असे वाटू लागल्यामुळे भुजबळ यांनी बाळासाहेबांना धक्का द्यायचा निर्णय घेतला. अर्थात त्या काळात ते करणे तितके सोेपे नव्हते. शिवसेनेतून बंड केल्यावर तीन महिने भुजबळ भूमिगत होते. पुढे ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्यावरून आपण शिवसेनेतून बाहेर पडलो, असे भुजबळ यांनी आपल्या बंडामागील कारण सांगितले.

शरद पवार त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. भुजबळ काँग्रेसमध्ये आले. पुढे सोनिया गांधी यांंच्या विदेशीपणाचा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केल्यामुळे त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यावेळी पवार यांच्यासोबत त्यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून छगन भुजबळ होते. शरद पवार जसे सांगत होते त्याप्रमाणे ते वागत होते. शरद पवार यांनी त्यांना उपमुख्यमंत्री होण्याची संधी दिली.

त्यानंतर त्यांच्याकडील ते पद काढून घेऊन अजित पवार यांना दिले. तरी त्यांनी आपल्या भावना दाबून ठेवल्या. ते अधूनमधून भूकंपाची भाषा करीत असत, पण असे बरेच भूंकप मी पचवले आहेत, असे शरद पवार यांनी सांगितल्यावर ते गप्प बसत असत. मध्यंतरी मनी लाँड्रिंग प्रकरणाचेे आरोप त्यांच्यावर झाले. त्यांची प्रचंड मालमत्ता जप्त करण्यात आल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर दिसू लागल्या. त्याच प्रकरणात त्यांना कारावास झाला. भुजबळ यांना कारावासात पाठवून त्यांना

खरंतर मोठा धक्का देण्यात आला. कारण भायखळ्यामध्ये एका भाजीच्या दुकानापासून सुरुवात करून भुजबळ यांनी इतकी मजल मारली होती. ते त्यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी स्पर्धा करतात की काय, अशीही चर्चा सुरू झाली होती. भुजबळ यांना तुरुंगात पाठवण्यात त्यांची ही वाढलेली ताकद कमी करण्याचा हेतू नव्हता ना, अशीही चर्चा सुरू होती.

कारण अडीच वर्षांनी सफेद केस झालेले गलीतगात्र भुजबळ प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जामिनावर बाहेर पडले तेव्हा अपनोनेही मारा हम को गैरो मे कहाँ दम था, अशा स्वरूपाची भावना त्यांनी व्यक्त करून आपल्या मनातील खंत व्यक्त केली होती, पण शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या डोक्यावर महात्मा जोतिबा फुले यांची पगडी ठेवून त्यांचे डोके शांत केले होते.

महाराष्ट्रात भाषणामधून हिंदी आणि उर्दू भाषेत शेरोशायरी पेश करण्याची तशी फारशी परंपरा नाही, पण भुजबळ मात्र बरेचदा आपल्या भाषणामधील शेरोशायरीने गालिबची आठवण करून देतात. ते ज्यांच्या तालमीत वाढले, त्या बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनीही कधी आपल्या भाषणातून शेरोशायरीची बरसात केली नाही. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या शेरोशायरीला विशेष बहार आलेली आहे. जेव्हा माणसाला जीवनात एकांत आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागतो तेव्हा त्याच्यातील कविमन जागे होत असावे.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील सगळ्यांना ओबीसी म्हणून प्रमाणपत्रे द्या आणि त्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी भूमिका घेऊन उपोषण आणि आंदोलन सुरू केले. त्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले. तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी ओबीसींची बाजू घेऊन छगन भुजबळ मैदानात उतरले. त्यांनी जरांगेंना जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यावेळी भुजबळ यांच्या सभांना इतका मोठा प्रतिसाद मिळू लागला की भुजबळ आता मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा रंगू लागली, पण पुढे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आवरते घेतले. त्यामुळे छगन भुजबळही शांत झाले.

छगन भुजबळ हे खरंतर शरद पवारांचे निष्ठावान समर्थक. जेव्हा आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जात नाही हे कारण देऊन अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केले तेव्हा भुजबळ यांनी शरद पवार यांची इतक्या वर्षांची साथ सोडून ते अजित पवारांसोबत आले, पण त्याच अजित पवार यांनी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला, तेव्हा छगन भुजबळ यांना त्यात स्थान दिले नाही. त्याचे भुजबळ यांना खूप वाईट वाटले.

आपल्या अस्मितेला धक्का बसला, असे भुजबळ म्हणाले. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीतून जो पराभव झाला, त्यात छगन भुजबळ यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. त्याचा राग अजितदादांनी भुजबळ यांच्यावर काढला, असे मानले जाते, पण चार टर्म खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर अगदीच नवख्या असलेल्या सुनेत्रा पवार यांचा निभाव लागणे अवघड होते हे कुणीही सांगेल. त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठ सदस्याला मंत्रिपद का देण्यात आले नाही, मेरा गुनाह क्या हैं, असे विचारत भुजबळ फिरत आहेत.

त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे, त्याविषयी नुकतेच विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. भुजबळ पुढे जे होईल ते पुढे पाहत राहणार आहेत की शरद पवार यांच्याकडे परत जाणार आहेत? नुकतेच शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले. तेव्हा शरद पवार यांनी भुजबळ यांना कागदावर काहीतरी लिहून दिले. त्याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, पर्दे मे रहने दो, पर्दा न उठाओ.

Jaywant Rane
Jaywant Rane
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -