Homeसंपादकीयअग्रलेखChhagan Bhujbal : मेरा वक्त भी बदलेगा?

Chhagan Bhujbal : मेरा वक्त भी बदलेगा?

Subscribe

‘मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी’ अशी शायरी म्हणत छगन भुजबळांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिले आहे. समता परिषदेच्या मेळाव्यात आणि त्यानंतरही भुजबळांनी अजित पवारांसंदर्भात जी वक्तव्ये केली, ती बघता भुजबळ आता राष्ट्रवादीत रमणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. खरंतर राजकारणात कोणाच्याही शब्दाला किंवा कृतीला अंतिम मानता येत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.

आज छगन भुजबळ वयाच्या ७७व्या वर्षीही आपल्या स्वभावातील आक्रमकता टिकवून आहेत, मात्र तरीही ते एका विचित्र सापळ्यात अडकले आहेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आणि पक्षांतर्गत राजकीय गोटात होणार्‍या त्यांच्या उपेक्षेमुळे त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा त्यांच्या राजकीय अस्तित्वावर आणि पक्षातील स्थानावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे. त्यांच्या या कृतीला ‘स्वत:च्याच पायावर कुर्‍हाड मारणे’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाने महायुतीत प्रवेश करताच छगन भुजबळ यांना मंत्रीपदाचा लाभ मिळाला होता, परंतु मंत्रीपदाची संधी मिळूनही त्यांचे समाधान झाले नाही. पक्षांतर्गत समांतर नेत्यांनी त्यांची उपेक्षा केली. मंत्रिमंडळातून कधीही काढले जाण्याची भीती सतत त्यांच्या मनावर होती. यामुळेच त्यांनी मंत्रीपदासाठी किंवा लोकसभेच्या तिकिटासाठी अधिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये ते स्वत:ला अजित पवार यांच्याशी थेट संघर्षाच्या उंबरठ्यावर घेऊन गेले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांचा आक्रमक पवित्रा आणि मनोज जरांगे यांच्यासोबतची थेट वादावादी, यामुळे मराठा समाजातही नाराजी पसरली. मराठा आणि ओबीसी समाजात उघडपणे संघर्ष निर्माण झाल्याने भुजबळ यांचे राजकीय समीकरण अधिकच बिघडले. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांची अजित पवार यांच्यावरील नाराजी आणि त्यातून उगम पावलेला सत्तेचा संघर्ष हा अधिक जटिल आणि गंभीर बनला आहे.

- Advertisement -

छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यातील वाद ही एका दिवसाची घटना नाही. भुजबळ यांनी शरद पवार गटाचे निलेश लंके यांना अहमदनगरमधील विजयासाठी केलेली मदत, तसेच सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, या दोन घटनांनी अजित पवार यांना भुजबळ यांच्याविषयी नाराजी निर्माण करण्यास भाग पाडले. सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवार यांच्या घरी तणाव होता, असे सांगत भुजबळांनीच या घडामोडींना दुजोरा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील राजकारणातही भुजबळांचा दुटप्पीपणा कायम दिसत राहिला. शिवसेनेच्या ज्या हेमंत गोडसे यांनी स्वत: छगन भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांचा लोकसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव केला होता, त्या हेमंत गोडसेंना पराभूत करण्यात भुजबळांनी यंदाच्या लोकसभेत महत्त्वाची भूमिका बजावली. गोडसेंना उमेदवारी मिळत नव्हती, त्यावेळी सातत्याने त्यांच्या विरोधात वक्तव्य करून भुजबळांनी वातावरण गढूळ केले.

आपलाही या निवडणुकीत विजय होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर आपण माघार घेत असल्याचे नाट्य उभे केले. त्यानंतरही भुजबळ गप्प बसले नाहीत. त्यांचा मुलगा पंकज भुजबळ यांना विधान परिषदेत संधी मिळूनदेखील समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघात शिवसेनेच्या सुहास कांदे यांना आव्हान दिले. युतीचे महत्त्वाचे नेते म्हणून ज्या भुजबळांची ओळख आहे, त्यांचाच पुतण्या समीर भुजबळ युतीत मिठाचा खडा बनत असेल, तर अजित पवार त्यांना कसे माफ करतील? म्हणूनच भुजबळांच्या बंडानंतर अजित पवारांकडून कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाही.

छगन भुजबळ यांच्या या आक्रमक धोरणामुळे त्यांचे स्वत:चेच राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. आजच्या घडीला त्यांच्यापुढे तीन प्रमुख पर्याय आहेत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे राष्ट्रवादीत राहून संघर्ष करणे, परंतु पक्षात त्यांना मिळणार्‍या स्थानाच्या अभावामुळे हा मार्ग कठीण वाटतो. दुसरा पर्याय म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणे. त्यांनी अलीकडे भाजपच्या नेत्यांची भलामण केली असली तरी अजित पवार यांची सहमती नसताना हा निर्णय घेणे कठीण ठरेल. तिसरा पर्याय म्हणजे स्वतंत्र नेतृत्व उभे करणे.

ओबीसी समाजाच्या संघटनाला अधिक बळकटी देऊन समता पार्टीसारख्या संघटनेद्वारे नवा राजकीय प्रवास सुरू करणे. या तिन्ही पर्यायांत त्यांना गतवैभव प्राप्त होईल असे दिसत नाही. त्यांच्या अलीकडच्या अतिरेकी आक्रमकतेमुळे त्यांचे नुकसान होण्याचीच शक्यता अधिक आहे. संयमाने आणि चर्चा करून त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता, तर त्यांची राजकीय प्रतिष्ठा कायम राहिली असती.

भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज पुन्हा एकत्र येईल का किंवा ते भाजपमध्ये जाऊन आपल्या राजकीय भविष्याला नवी दिशा देतील का? त्यांच्या अलीकडच्या धोरणांनी त्यांनी राजकीय साखळी गमावल्याचे दिसते. तिढा निर्माण झाला तरी तो थोरल्या पवारांप्रमाणे संयमाने सोडवावा लागतो. भुजबळ यांची आक्रमकता त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोकादायक ठरत आहे. या संघर्षातून ते उभे राहून पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी येतील का, याबाबत साशंकता आहे. एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा, असे भुजबळ म्हणत असले तरी त्यासाठी त्यांना बदले की आग नियंत्रणात आणावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -