राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर हे थोर बालसाहित्यिक, चरित्रकार व कवी होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२५ रोजी झाला. त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण घेतले होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.‘साने गुरुजी जीवनचरित्र’ हा त्यांचा अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण ग्रंथ आहे.
त्यांचे संपूर्ण लेखन ‘राजा मंगळवेढेकर’ याच टोपणनावाने प्रसिद्ध आहे. राष्ट्रसेवादल, साने गुरुजी कथामाला, आंतरभारती इत्यादी सांस्कृतिक कार्य करणार्या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कथाकथन, बालमेळावे, शिबिरे इत्यादींच्या निमित्ताने त्यांनी भारतभर भटकंती केली. या अनुभवविश्वातून त्यांची अनेक पुस्तके आकारास आली आहेत.
कथाकथनांमधून बालगोपाळांची मने जिंकणार्या राजा मंगळवेढेकरांनी बालवाचकांसाठी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे बहुतांश लेखन चरित्रे, वृक्ष, निसर्ग व विज्ञान या विषयांवर आधारित आहेत.
आनंद गोष्टी, माझ्या आवडत्या गोष्टी, रंगीत फुगे, सरदारजीच्या गोष्टी, शहाणे गाढव, श्रीकृष्णाच्या चातुर्यकथा, झाडांची गाणी-झाडांच्या गोष्टी, अखेरची झुंज, आपले पुष्पमित्र, आपले वनमित्र, आठवणीतील अण्णा-गदिमा, भले बुद्धीचे सागर नाना, भूमिपुत्र, बिनभिंतीची उघडी शाळा, बिरबलचे भाईबंद, चिंतूची करामत आणि मनीची फजिती, ज्ञानेश्वरीतील कथा, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, इंदिरा गांधी, भारुड, गांधीजींच्या गोष्टी, पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता गांधी, शिक्षक मित्रांनो अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
१९८५ साली पुण्यात भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार, बालसेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. राजा मंगळवेढेकर यांचे १ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.