Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeसंपादकीयओपेडSocial Media and Parenting : सोशल मीडिया आणि जागरूक पालकत्व

Social Media and Parenting : सोशल मीडिया आणि जागरूक पालकत्व

Subscribe

मोबाईल ही काळाची गरज आहे, हे आपण अनेकदा म्हणतो आणि आपण ते मान्यदेखील करतो. हे खुशीने मान्य करा वा नका करू, पण हेच सत्य आहे. त्यामुळेच पालक-मुलांमधील मोबाईल, सोशल मीडिया या मुद्यांवरून होणारा विसंवादाचा प्रश्न सुटला पाहिजे. कारण आपण मोबाईलला स्वीकारलं तेव्हाच इंटरनेट आणि सोशल मीडियासारखं आभासी जग हेदेखील आपल्या जीवनाचा भाग झालं. त्यामुळे या सगळ्या बदलांसोबत जगण्यासाठी आपण स्वत:ला आणि मुलांना तयार करायला हवं.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. टीव्ही, कॉम्प्युटर आणि फोन या सर्व सुविधा एकाच माध्यमातून देणारा स्मार्ट फोन आणि आपले अगदी जीवाभावाचे मैत्र झाले आहे. सोशल मीडियाने तर काहींचं संपूर्ण जगणंच व्यापलं आहे. कोरोना काळात हाच मोबाईल, सोशल मीडिया लहान मुलांच्यादेखील आयुष्याचा अविभाज्य भाग झाला, पण मुळातच हे सगळं आभासी जग आहे.

हे आभासी जग आणि प्रत्यक्षातील जगणे यात जमीन-आसमानाचा फरक असतो याची जाणीव काही या मुलांना नसते (अर्थात ती अनेकदा मोठ्यांनादेखील नसते) आणि यातूनच ही मुलं एका दुष्टचक्रात अडकत जातात. त्यातून त्यांना न दुखावता, कधी त्यांच्या कलाने घेऊन तर कधी त्यांना दटावून त्यापासून योग्य अंतर राखायला शिकवणं ही एक सजग, जागरूक पालक म्हणून आपलीच जबाबदारी आहे.

प्रसंग पहिला – धाराशिव जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुलींनी चक्क स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला आणि थेट कोरियाचा मार्ग धरला होता. घरातून 5 हजार रुपये घेऊन त्या तिघी मुली कोरियातील एका डान्स ग्रुपला भेटण्यासाठी निघाल्या होत्या, मात्र कुटुंबीयांकडून मुलींचे अपहरण झाल्याची बातमी पोलिसांपर्यंत पोहचली आणि पोलिसांनी अवघ्या ३० मिनिटांत उलगडा केला. त्या तिन्ही मुलींना ताब्यात घेतलं.

प्रसंग दुसरा – मुलगी रील बघते म्हणून आई-वडील ओरडले आणि ती मुलगी चिडून घरच सोडून गेली. बरं जाता- जाता ती आपल्या दोन मैत्रिणींनादेखील घेऊन गेली आणि मग आधी घाबरलेल्या या पालकांची मुलींना शोधण्यासाठी एकच धांदळ उडाली. फार लांबची नाही, मुंबई उपनगरातील ही घटना आहे.

प्रसंग तिसरा – सोशल मीडियावरच एक व्हिडीओ व्हायरल होत होता. त्यात शाळेतून आलेल्या मुलाने लगेच हातात मोबाईल घेतला म्हणून त्याची आई त्याला रागावली. आईने सांगितल्याने धुसफुसत का होईना मुलाने मोबाईल बाजूला ठेवला, पण काही वेळाने पुन्हा त्याचा राग उफाळून आला आणि त्याने आपल्या आईला चक्क क्रिकेटच्या बॅटने मारले. विशेष म्हणजे तो पुन्हा मोबाईल घेऊन बसला. आपल्या आईला आपण मारल्याचे कोणतेही दु:ख त्याला झालेले दिसले नाही.

अशा अनेक घटना आपण आपल्या आसपास घडताना बघत असतो किंबहुना हे घरोघरचे चित्रही असू शकते. यातल्या कित्येक घटना समोर येतात, तर कितीतरी घटना या उघडही होत नसतील. मोबाईलवरून मुलांना ओरडणे हे अलीकडे अगदी कॉमन झाले आहे आणि आई-बाबांनी मोबाईलवरून टोकल्यावर मुलांनी खुन्नस देणे हेदेखील तेवढेच नैसर्गिक आहे.

मोबाईल ठेवायला सांगितलं की मुलं चिडचिड, आदळआपट करतात, रुसून बसतात, तर कधी वर उल्लेखिल्याप्रमाणे अगदी टोकाचं पाऊलही उचलतात आणि त्यानंतरही आई-बाबा आम्हाला समजून घेत नाहीत, असंही त्यांचं म्हणणं असतं. मुलं अजिबातच ऐकत नसतील तर क्वचित पालक मुलांवर हातही उचलतात, पण आपल्याला कशासाठी मारलं हे लक्षात येण्याऐवजी मुलांच्या मनात पालकांबद्दलचा राग अजूनच वाढीस लागतो.

मोबाईल ही काळाची गरज आहे, हे आपण अनेकदा म्हणतो आणि आपण ते मान्यदेखील करतो. हे खुशीने मान्य करा वा नका करू, पण हेच सत्य आहे. त्यामुळेच पालक-मुलांमधील मोबाईल, सोशल मीडिया या मुद्यांवरून होणारा हा विसंवादाचा प्रश्न सुटला पाहिजे. कारण आपण मोबाईलला स्वीकारलं तेव्हाच इंटरनेट आणि सोशल मीडियासारखं आभासी जग हेदेखील आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

त्यामुळे यासोबतचं जगणं आपण टाळू शकत नाही आणि मुलांना त्यापासून आपण लांबदेखील ठेवू शकत नाही. यावर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे या सगळ्या बदलांसोबत जगण्यासाठी आपण स्वत:ला आणि मुलांना तयार करायला हवं. कारण वर उल्लेखिलेल्या प्रसंगांचे दोष हे अनेकदा पालक म्हणून आपल्यावरच येत असतात.

पालकत्व म्हणजे काय, तर आपण आपल्या आई-आजी, आजूबाजूच्या लोकांचे अनुभव ऐकतो, आपलं बालपण आठवतो आणि त्यातून आपला असा एक अंदाज बांधून त्याप्रमाणे मुलांना वाढवतो. आपल्या लहानपणी ना मोबाईल होते ना इंटरनेट. त्यामुळे आजच्या मुलांच्या तुलनेत आपलं बालपण सुखाचं होतं, पण नेमक्या याच गोष्टीमुळे आजचं पालकत्व मात्र कठीण झालं आहे. कारण आजच्या पालकत्वात प्रत्यक्ष आणि आभासी जगाची आव्हानं आहेत आणि म्हणून हा प्रवास अवघड आहे.

एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीपर्यंत झालेला आपला प्रवास हादेखील पालकत्वाच्या प्रवासात एक अडथळा आहे. पूर्वी घरात अगदी काका-मामा नाही तरी आजी-आजोबा असायचे. मुलांवर त्यांचं लक्ष असायचं आणि मुलांना त्यांचा धाकही असायचा. शिवाय अनेक घरात आई असायची. त्यामुळे मुलांशी चांगला संवाद होता, पण आता घरात आजी-आजोबा नाहीत.

काळाची गरज म्हणून म्हणा किंवा आणखी काही कारणासाठी म्हणून आईदेखील घराबाहेर पडली. बालपण घरात घालवणारी मुलं नाईलाज म्हणून पाळणाघरात गेली. घरात दोघे किंवा तिघेच असल्याने आपली कामं पूर्ण करताना मुलं मध्ये येऊ नयेत म्हणून त्यांना मोबाईल देण्याचीही सवय लागली आणि हा मोबाईल त्यांच्या आयुष्याला इतका चिकटला की आता तो वेगळा करणं फारच कठीण झालं आहे.

या मोबाईलमध्ये मुलं इतकी रमली आहेत की तो आईबाबा किंवा मित्रमैत्रिणी, आजी-आजोबांनादेखील पर्याय ठरू पाहत आहे. यात अनेकदा पालकांचीही चूक आहे असे सर्रास म्हटलं जातं. कारण मुलांकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर पालक त्याला हे केलंस तर मोबाईल देईन, असं आमिष दाखवतात, पण यातून ती वस्तू मिळवण्याचं वेड लागतं आणि तंत्रज्ञानाचा वापर जाणीवपूर्वक कसा असायला हवा हे मुलांच्या लक्षात येत नाही.

दोन पिढ्यांमधील अंतर. कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये नेहमीच अंतर असतं हे सर्वमान्य आहे, पण या दोन पिढ्यांमध्ये अंतरासोबतच विसंवादही अनेकदा दिसतो. लहानपणी आई-बाबा सांगतात म्हणून आनंदाने ऐकणारी ही मुलं जरा मोठी झाली की (शिंगं फुटली की) तीच गोष्ट नाईलाजाने ऐकू लागतात.

हे मुलं आणि पालक या दोघांच्याही लक्षात येत असतं, मात्र त्यावर संवादरूपी तोडगा न काढता पालक मुलांना दोष देतात, रागावतात आणि मुलं आई-बाबा सारखे ओरडत असतात हेच डोक्यात धरून पालकांपासून अजूनच दुरावतात. यात सोशल मीडिया, तंत्रज्ञानाचा वाटादेखील मोठा आहे. कारण पूर्वी काहीही झालं तरी मुलं आईपाशीच येऊन शांत व्हायची, पण आता आई सतत ओरडते म्हणून त्यालाही पर्याय शोधले जाऊ लागले आहेत. ही दरी भरून काढणं हे मोठंच आव्हान सध्याच्या पालकांसमोर आहे.

आजच्या डिजिटल युगात पालकत्व निभावताना जुन्या गोष्टींच्या आधारे ज्याप्रमाणे काही गोष्टी करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे काही नवीन कौशल्येही आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी पालक अनेकदा उदासीन असतात. मुलांना कोणत्या गोष्टीसाठी परवानगी द्यायची, कशाला द्यायची नाही याचा ताळमेळ आवश्यक आहे आणि हे फारच मोठं आव्हान आहे.

मुलं काय बघतात यासाठी त्यांच्यावर वॉच नाही तर त्यांच्याशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. पालक म्हणून मुलांना आपला विश्वास वाटायला हवा. आपल्याकडून एखादी गोष्ट चुकली तर आपले आई-बाबा आपल्याला ओरडतील पण समजूनही घेतील हा विश्वास मुलांच्या मनात रुजवणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हा संवाद साधणं आणि विश्वास रुजवणं जरी आपल्याला जमलं तरी या सजग पालकत्वाची महत्त्वाची पायरी आपण सर केल्यातच जमा आहे.