Homeसंपादकीयअग्रलेखLegends of Indian Film Industry : हम तुम ना जुदा होंगे...

Legends of Indian Film Industry : हम तुम ना जुदा होंगे…

Subscribe

भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक दिग्गज आहेत ज्यांनी चित्रपटसृष्टीला भरभरून योगदान दिले आहे. त्यापैकी दोन दिग्गज असे आहेत की ज्यांच्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास कधीही पूर्ण होणार नाही. यातील पहिले आहेत राज कपूर आणि दुसरे आहेत मोहम्मद रफी. हे दोन्ही महान कलाकार आज आपल्यात असते तर ते 100 वर्षांचे असते. दोन्ही कलाकारांची शताब्दी आहे. राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी झाला, तर मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजीचा. यातील राज कपूर शोमॅन म्हणून ओळखले जातात, तर रफीसाहेब म्हणजे साक्षात देवाने घडवलेले पार्श्वगायक होते.

ही दोन्ही माणसे आपापल्या क्षेत्रात खर्‍या अर्थाने बाप माणसे होती. यातील राज कपूर म्हणजे सिनेसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न होते. अभिनेते, पटकथा-संवाद, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिकांमध्ये राज कपूर आयुष्यभर वावरले. वास्तविक त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर म्हणजे चित्रपट आणि रंगभूमीवरील दिग्गज कलाकार होते, मात्र राज कपूर यांची सुरुवात शून्यापासून झाली. सेट झाडणे, सहाय्यक अशी सर्व कामे त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे केली.

पृथ्वीराज कपूर यांनी ठरवले असते तर राज कपूर यांना दणक्यात लॉन्च करू शकले असते, मात्र मुलाने कर्तृत्वाने या क्षेत्रात नाव मिळवावे, अशी त्यांची इच्छा होती आणि राज कपूर यांनाही त्याची जाण होती. त्यामुळेच राज कपूर यांच्या चित्रपटांनी कर्तृत्वाचा असा काही ठसा उमटवला की विदेशी प्रेक्षकांनाही त्यांचा चित्रपट आपलासा वाटला. ‘नीलकमल’ या चित्रपटातून (१९४७) राज कपूर पहिल्यांदा नायक म्हणून झळकले.

त्यानंतर वर्षभरातच त्यांनी ‘आर. के. फिल्म्स’ची स्थापना करून ‘आग’ चित्रपटाची निर्मिती केली. बरसात, आवारा, श्री ४२०, जिस देश में गंगा बहती हैं, संगम यांसह त्यांचे सर्वच चित्रपट गाजले. त्यांच्या चित्रपटांतील गाण्यांची मोहिनी रशिया, जपान, चीनमधील प्रेक्षकांवरही होती. आवारा हू, मेरा जुता हैं जपानी आदी गाण्यांनी तर सर्वांना वेड लावले होते. शिवाय सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मैली, प्रेम रोग, हिना अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

राज कपूर यांनी अनेक चढउतार पाहिले, पण कधीही खचून गेले नाहीत. त्यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट दणकून आपटला. ते कर्जबाजारी झाले, पण खचले नाहीत. त्यानंतर कल आज और कल आणि बॉबी या चित्रपटांनी इतिहास घडवला. कथा, पटकथा, संवाद, संकलन याची उत्तम जाण, गीत-संगीताचा कान आणि चित्रपट निर्मितीतील बारकावे ठावूक असल्याने तो चित्रपट राज कपूर यांचा चित्रपट म्हणूनच ओळखला जायचा.

दिग्गज मांदियाळीतील दुसरे कलाकार म्हणजे मोहम्मद रफी. रफीसाहेब सप्तसुरांचे अधिपती होते. रफीसाहेब गात नव्हते तर साक्षात सूर त्यांच्या गळ्यातून बाहेर पडायचा. भावगीत, भक्तिगीत, सुगम संगीत, प्रेमगीत, भजन, बालगीत, कव्वाली, गझल असे संगीतातील असंख्य सूर त्यांनी लीलया गायले आहेत. अत्यंत निर्मळ अशीच रफीसाहेबांची ओळख आहे. कलाकार किती सज्जन असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रफीसाहेब! रफीसाहेबांचे गाणे मनाला आनंद देणारे असते.

त्यांनी हिंदी, मराठी, पंजाबी आणि इतर भारतीय भाषांमध्ये गायले आहे. त्यांचे गाणे कायम हृदयाला भिडणारे राहिले आहे. 1944 मध्ये ‘गुलबलोच’ या पंजाबी चित्रपटासाठी त्यांना पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली, मात्र 1946 मध्ये झळकलेल्या ‘अनमोल घडी’ या चित्रपटाने मोहम्मद रफींना नाव मिळवून दिले. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक म्हणजे रफीसाहेब असे समीकरण बनले.

नौशाद, अनिल बिश्वास, हेमंत कुमार, मदन मोहन, रवी, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांसह अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. चौदवी का चांद हो, सुहानी रात ढल चुकी ते अगदी तु कही आसपास हैं (आसपास) या गाण्यापर्यंत रफीसाहेबांनी रसिकांना गानसफर घडवली. नायकाला साजेसा आवाज ही रफीसाहेबांची खासियत होती. त्यातही शम्मी कपूरचा आवाज म्हणजे मोहम्मद रफी हे समीकरण होते.

ते कलाकार म्हणून जेवढे मोठे होते तेवढेच माणूस म्हणूनही मोठे होते. अनेक निवृत्त कलाकारांना रफीसाहेबांनी मदत केली होती, हे त्यांच्या पत्नीलाही रफीसाहेबांच्या मृत्यूनंतर कळले, असा रफीसाहेबांचा स्वभाव होता. रफीसाहेब अजातशत्रू होते. लता मंगेशकर यांच्यासोबतच्या त्यांच्या वादाचे उदाहरण दिले जाते, मात्र तो रॉयल्टीवरून झालेला तात्त्विक वाद होता. तसेच रफीसाहेब आणि किशोर कुमार यांच्यातही संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात किशोर कुमार यांना रफीसाहेबांबद्दल प्रचंड आदर होता.

रफीसाहेबांच्या आवाजाची जादू अशी काही होती की जगभरातील कुठलाही संगीतप्रेमी त्यांच्याकडे आकर्षित होत होता. ३१ जुलै 1980 रोजी रफीसाहेब अल्लाला प्यारे झाले. त्या दिवशी निघालेली त्यांची अंत्ययात्रा (जनाजा) न भुतो न भविष्यती होती. त्या दिवशी वरुणराजालाही अश्रू अनावर झाले होते. तो धो धो बरसत होता आणि देशभरातून आलेले हजारो रफीसाहेबांचे चाहते भरपावसात अश्रू ढाळत होते. एवढी भव्य अंत्ययात्रा एखाद्या कलाकारासाठी त्यानंतर कधीही निघाली नाही. हे दोन्ही कलाकार आज 100 वर्षांचे असते. त्यांचे भारतीय सिनेसृष्टीतील योगदान कधीही विसरता येणार नाही.