-प्रदीप जाधव
कथा, कविता, कादंबरी, पोवाडे, नाटक, जलसा, चारोळी इत्यादी साहित्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. साहित्य मनोरंजनासाठी की माणूस घडवण्यासाठी, असे प्रश्न अनेक वर्षे चर्चिले जात असून चर्चा, मंथन सुरूच आहे. वास्तविक पाहता साहित्यातून मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनातून निकोप समाजनिर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे. साहित्याच्या संस्कारातून समाजमन तयार होत असतं. साहित्याकडे बघण्याचे दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.
काही लोक साहित्याकडे मनोरंजनाचं साधन म्हणून, तर काही माणूस घडवणारं प्रबोधन, परिवर्तनाचं शस्त्र या अर्थाने बघत असतात. खरं तर आपल्या सजग सम्यक दृष्टीतून साहित्याची मांडणी करून वैज्ञानिकदृष्टीचा मानवी समाज निर्माण व्हायला हवा. आताच्या घडीला साहित्य ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिली नाही. आज सर्व स्तरातून साहित्य निर्मिती होत असून साहित्याचा केंद्रबिंदू शहराकडून ग्रामीण भागाकडे सरकत आहे, त्यातून नवनवीन साहित्यिक उदयास येत आहेत.
देशात आणि महाराष्ट्रात जात, धर्म, पंथ, भाषा, समूहानुसार साहित्य निर्मिती होत आहे. जातीय, धार्मिक, प्रांतिक, भाषिक अशी वेगवेगळी विचारधारा स्वीकारून अनेकांनी साहित्य संस्था, मंडळे स्थापन केली. प्रत्येक साहित्य संस्थेला, मंडळाला स्वत:ची विचारधारा, भूमिका, ध्येय आणि उद्दिष्टे आहेत. बुद्धकाळात भारत देश जम्बुद्वीप म्हणून ओळखला जात होता. तर बुद्धकालीन जम्बुद्वीपाच्या पश्चिमेकडील समुद्रतटीय प्रदेश ‘अपरान्त’ नावानं सुपरिचित होता. गुजरातपासून सुरू होणारा हा समुद्रतटीय प्रदेश म्हणजेच मुंबईसह गोव्यापर्यंतचा संपूर्ण कोकण प्रांत होय.
हा प्रदेश चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या साम्राज्याचाही भाग होता. त्यामुळं बौद्ध संस्कृतीच्या खाणाखुणा इथं जागोजागी आढळतात. पुढे प्रतिक्रांतीत झालेल्या वाताहातीत बौद्ध संस्कृतीच्या इतिहासाचं सोनेरी पान असलेला अपरान्त विस्मृतीत गेला होता. कोकणातील निष्ठावान बौद्ध अनुयायांच्या विचारी अन् लिहित्या पिढीला इतिहासाचं परिशीलन करताना, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या बौद्ध संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे पुरावे पुरातत्त्व अभ्यासकांच्या लिखाणातही सापडतात.
त्यामुळेच आजचा कोकण म्हणजे प्राचीन जम्बुद्वीपातील विस्मरणात गेलेला बौद्धधम्म प्रभावित अपरान्त असल्याचं निर्विवाद सिद्ध होतं. प्रख्यात साहित्यिक, दलित पँथरचे सहसंस्थापक ज.वि.पवार यांनी कोकणातील साहित्यिक विचारवंतांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रा.आनंद देवडेकर यांनी सुचविलेलं ‘अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी’ हे नाव चर्चेअंती एकमतानं सर्वमान्य झालं आणि २२ मार्च २०२३ रोजी ‘अपरान्त कला साहित्य प्रबोधिनी’ उदयास आली.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मानवी मूल्यांचा परिपोष करणार्या साहित्य निर्मितीला उत्तेजन देणं, समाजात विज्ञाननिष्ठ व बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोन वृद्धिंगत करणं हे मुख्य उद्दिष्ट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मानव समाजनिर्मिती करणे हा संस्थेचा ध्यास. दिनांक १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी संस्थेच्यावतीने तिसरी सम्यक साहित्य कला संगीती डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक क्रांतीभूमी महाड येथे झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
मुंबईची चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी आणि महाडची क्रांतीभूमी प्रेरणा आणि ऊर्जास्थळं आहेत. या साहित्य संगीतीमध्ये अपरान्त संगीती विशेषांक प्रकाशित केला असून मूलभूत विचारांची मांडणी, माणुसकीची ज्योत कायम ज्वलंत ठेवून मानवतेचा धागा जगभर बांधावा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अनमोल विचारांचा ठेवा असणार्या विशेषांकाचं संपादन ज.वि.पवार यांनी केलं आहे.
युगायुगांचा अंधार जाळणारी ज्योत प्रथम इथच प्रज्वलित झाली. ही ज्योत अंधार जाळणारी तर होतीच; परंतु ही ज्योत गुलामांना त्यांच्या शोचनीय गुलामीचं दर्शन घडविणारीही होती. किंबहुना ही ज्योत बहिष्कृतांना अंतिम डेस्टिनेशनच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी आवश्यक त्या आश्वासक उजेडाची पेरणी करत होती. त्रिपिटकाच्या गाथागाथांतून मानवी कल्याणाचं गीत गाणारे तथागत भगवान बुद्ध केवळ धम्म संस्थापकच नाहीत तर जगातले पहिले महाकवीही आहेत. तथागतांपासून सुरू झालेला कथा, काव्य, शास्त्र, तत्त्वज्ञानादी साहित्यानं संपन्न असलेला पवित्र पालि त्रिपिटक साहित्याचा अमूल्य ठेवा हा आमच्या साहित्यिकांसाठी समृद्ध वारसा आहे.
वर्तमानकालीन सर्जनशीलतेला आविष्कृत करण्यासाठी आवश्यक असलेले मूल्याधिष्ठीत संदर्भ त्यातून मिळतात. चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळात झालेल्या तिसर्या धम्म संगीतीनंतर बोधीवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेला गेलेल्या संघमित्रा अन् राजपुत्र महेंद्राचा बोधीवृक्ष सिंहली भाषेत बहरला. बौद्ध धम्माचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई यांच्या ओव्या, गाथांवर झाला आहे. प्रा.आनंद देवडेकरांचं भाषण वाचताना शोध प्रबंध वाचल्याचा आनंद मिळतो.
संगीतीचे उद्घाटक ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांचंही भाषण या विशेषांकात प्रसिद्ध केलं आहे. ते आपल्या भाषणात म्हणतात, जग प्रचंड बदलले आहे. नित्य बदलत आहे, जग अनित्य आहे हे तथागत गौतम बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वीच सांगितले आहे. जग अनित्य आहे हे बुद्धतत्व काळाच्या पटलावर अजरामर ठरले आहे. अशा अजरामर तत्त्वाचे आपण अनुयायी, हे अजरामर तत्त्व आपल्या वाङ्मयातून किती उतरलं? ठरवून नव्हे! सहज काळाबरोबर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जग अनित्य आहे’ हे तत्त्व आपल्या हाती १९५६ साली दिलं.
७ दशकांचा काळ तसा छोटा नव्हे. आपली कविता, कथा, कादंबरी, नाटक १९५६ आधीचंच रडगाणं गात असते. आत्मकथने की स्वकथने. आजही २०२५ सालीसुद्धा बलुतेदारीतून मुक्त होताना दिसत नाही. मोबाईल, कॉम्प्युटर, मेट्रो, बीट्रो जगतो. आपली मुलं-मुली परदेशी पोचली, स्थिर झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न पूर्णत्वाकडे जाताना आम्ही पाहत आहोत. जे पाहतो ते वाङ्मयात का उमटत नाही की, आमच्या प्रतिभावंतांना ते जाणवत, पण उमगत नसेल.
१९६७ साली औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात डॉ.म.ना.वानखेडेंसह, रा.ग.जाधव, मे.पु. रेगे, पुष्पा भावे, म.भि.चिटणीस अशा मान्यवर विद्वान मंडळींची चर्चा होऊन चर्चेअंती ठरले, धर्मातरितांच्या साहित्याला, ‘दलित साहित्य’ संबोधावे. १९५६ साली बौद्ध झालेल्या साहित्यिकांच्या साहित्याला दलित साहित्य संबोधावे असे १९६७ साली ठरले. माझ्या दृष्टीनं हे एक मोठे कटकारस्थान होते, धर्मातरितांना बौद्ध वाङ्मयातून, बौद्ध संस्कारापासून, बौद्ध इतिहासापासून दूर ठेवण्याचे काही काळ या दुष्ट लोकांचे दूष्ट हेतू सफल झालेले दिसतात.
महाड संगतीचा ध्यास या लेखात ज.वि.पवार लिहतात, खोती पद्धतीच्या विरुद्ध बाबासाहेबांनी अनेक परिषदा घेतल्या. कणकवली, संगमेश्वर, चिपळूण, महाड, अलिबाग येथील परिषदांमधून बाबासाहेब स्वातंत्र्य, समता व बंधुता यांची शिकवण तर देत होतेच पण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा नाराही देत होते. परिणामी अवघ्या अपरान्त परिसरात समतेची, शिक्षणाची, स्वाभिमानाची चळवळ फोफावली.
दिनांक २५, २६ आणि २७ डिसेंबर १९२७ रोजी महाडचा सत्याग्रह संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सहकार्यांसोबत रायगडावर गेले. गडावर एक रात्र मुक्काम करून महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. बॅरिस्टर झालेल्यांपैकी किल्ले रायगडाला प्रत्यक्ष भेट देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव आहेत. बाबासाहेबांचे ऐतिहासिक किल्ले रायगड सफर यावर श्रीकांत जाधव यांचा उद्बोधक लेख आहे.
अपरान्तचे सिंहावलोकन या लेखात संस्थेचे सरचिटणीस संदेश पवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील बौद्ध लेणींचा इतिहास रोहित भोसले यांनी सांगितला आहे. डॉ. श्रीधर पवार यांनी महाडचा सत्याग्रह आणि बा.स.हाटेंच्या साहित्यावर प्रकाशझोत टाकला आहे. चवदारतळे सत्याग्रह आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका यावर संजय गमरे यांनी भाष्य केले आहे. घन:श्याम तळवटकर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हारावित गावचे सुपुत्र. त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे रजिस्ट्रार होण्याचा मान त्यांना मिळाला, त्यांच्याविषयी डॉ.संजय खैरेंनी माहिती दिली आहे. डॉ.सत्येंद्र राजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या संघर्षाचा इतिहास मांडला आहे. राष्ट्रपाल सावंत यांनी रायगडच्या साहित्यिक शिलेदारांची महती सांगितली आहे. त्याचबरोबर विश्वास पवार, आयदानकार उर्मिलाताई पवार, डॉ. कांता कांबळे, विजय मोहिते यांचे दर्जेदार लेख या विशेषांकात असल्याने मौल्यवान संदर्भग्रंथासारखाच दस्तावेज आहे.
=संपादक -ज.वि.पवार
=कार्यकारी संपादक -सुनील हेतकर
=प्रकाशक-अपरान्त प्रकाशन
=पृष्ठे -१४९, मूल्य -२०० रुपये