घरसंपादकीयदिन विशेषसाक्षेपी, समतोल समीक्षक रा. श्री. जोग

साक्षेपी, समतोल समीक्षक रा. श्री. जोग

Subscribe

रामचंद्र श्रीपाद जोग हे एक श्रेष्ठ मराठी समीक्षक. त्यांचा जन्म १५ मे १९०३ रोजी कोल्हापूरमधील गडहिंग्लज येथे झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत व मराठी घेऊन मुंबई विद्यापीठाचे बी.ए. (१९२३) व एम.ए. (१९२५) झाले. १९२६-६३ या काळात ते हं. प्रा. ठा. कॉलेज, नाशिक; विलिंग्डन कॉलेज, सांगली व फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे संस्कृत व मराठी या विषयांचे प्राध्यापक होते.

त्यांनी ‘निशिगंध’ या टोपण नावाने कवी म्हणून साहित्यक्षेत्रात प्रथम पदार्पण केले. ‘ज्योत्स्नागीत’ (१९२६) व ‘निशागीत’ (१९२८) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह. सरल भावाविष्कार हे त्यांतील कवितांचे वैशिष्ठ्य. पुढे मात्र त्यांनी साहित्यशास्त्र व काव्यसमीक्षा हेच आपले कार्यक्षेत्र मानले. ‘अभिनव काव्यप्रकाश’ (१९३०) या ग्रंथात संस्कृत काव्यशास्त्राची तत्त्वे साररूपाने मराठीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा प्रकारचा हा पहिलाच सुव्यवस्थित उपक्रम असल्याने त्याला महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत अग्रस्थान मिळाले.

- Advertisement -

त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘सौंदर्यशोध आणि आनंदबोध’ (१९४३). या ग्रंथाच्या पूर्वाधात ललितकलांतील सौंदर्याच्या घटकांचा विचार आलेला आहे. नवकाव्यातील दुर्बोधतेची चर्चा करणारे ‘मुख्यार्थाची कैफियत’ हे त्यांचे व्याख्यान, विरहतरंगाची मेघदूताशी तुलना करणारे समीक्षण व डांगी बोलीविषयीचा प्रदीर्घ निबंध हे त्यांचे लेखन अत्यंत विचारप्रवर्तक व म्हणून वादविषय झाले असले, तरी एकंदरीत तपशिलाविषयी दक्ष असणारे साक्षेपी व समतोल समीक्षक म्हणून जोगांचा लौकिक आहे. अशा या श्रेष्ठ समीक्षकाचे २१ फेब्रुवारी १९७७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -