रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा आज स्मृतिदिन. रामकृष्ण भांडारकर हे थोर प्राच्यविद्या संशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक होते. त्यांचा जन्म ६ जुलै १८३७ रोजी मालवण येथे झाला. मालवण, राजापूर व रत्नागिरी येथे आरंभीचे काही शिक्षण घेतल्यानंतर १८५४ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून हायस्कूलची परीक्षा ते उत्तीर्ण झाले व नंतर त्या इन्स्टिट्यूट कॉलेजचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला.
पुढे मुंबई विद्यापीठाचे बी.ए. (१८६२) व एम.ए. (१८६३) या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मुंबई व पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्रीपंडितजवळ न्याय, व्याकरण, वेदांत इत्यादींचा चांगला अभ्यास केला. हैदराबाद (सिंध) व रत्नागिरी येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके (प्रथम इंग्रजी व पुढे मराठी माध्यमातून) तयार केली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना संस्कृत शिकता आले. त्यानंतरही त्यांनी संस्कृतचा व्यासंग चालूच ठेवला.
कित्येक युरोपीय पंडितांनी संस्कृत व इतर प्राच्य भाषा यांचे त्यांच्या दृष्टिकोणातून संशोधन चालविले होते. भांडरकरांनी संस्कृतच्या या अध्ययनाला नवे चिकित्सक व निःपक्षपाती संशोधनाचे स्वरुप दिले. १८७४ मध्ये लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत नाशिक शिलालेखासंबंधी त्यांचा निबंध वाचला गेला. १८८५ मध्ये जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पीएच डी. अर्पण केली. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’, लंडन व मुंबई, ‘जर्मन ओरिएंटल सोसायटी’, ‘अमेरिकन ओरिएंटल सोसायटी’ इटली येथील ‘एशियाटिक सोसायटी’, सेंट पीटर्झबर्ग येथील ‘इंपिरिअल अकॅडमी आँफ सायन्स’ इ. जगप्रसिद्ध संस्थांनी भांडारकरांना सदस्यत्व दिले. अनेक संस्कृत हस्तलिखितांसंबंधी त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिले. प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली. अशा या थोर भाषाशास्त्रज्ञाचे २४ ऑगस्ट १९२५ रोजी निधन झाले.