घरसंपादकीयदिन विशेषस्वातंत्र्यचळवळीतील रणरागिणी लक्ष्मी सेहगल

स्वातंत्र्यचळवळीतील रणरागिणी लक्ष्मी सेहगल

Subscribe

जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले.

लक्ष्मी सेहगल या भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९१४ रोजी डॉ. एस. स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दाम्पत्यापोटी चेन्नई येथे झाला. वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील होते. आई स्वातंत्र्यचळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या; त्या आईबरोबर कोलकाता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या (१९२८). अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी दोनशे स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन करून घेतले होते. त्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा त्यांच्यावर प्रभाव पडला.

त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला (१९३०). त्यांना अटक झाली; पण शाळा, महाविद्यालय यांवर बहिष्कार घालण्याची कृती त्यांना अमान्य होती. देशाच्या स्वातंत्र्याकरिता शिक्षण आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पदवी मिळविली (१९३८). तसेच स्त्रीरोग चिकित्सा व प्रसूतिशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले (१९३९). त्यांनी चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात अल्पकाळ नोकरी केली. एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला गेल्या (१९४०). तिथे त्यांनी भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना उघडला.

- Advertisement -

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली (१९४३). २ जुलै १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर आले होते. त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी, अशी इच्छा व्यक्त केली. या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या, शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले. सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले. जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले. अशा या महान वीरांगणेचे २३ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -