बंगाली लेखक, कला समीक्षक विष्णू डे

विष्णू डे हे बंगाली भाषेचे महत्त्वपूर्ण कवी, गद्यलेखक, अनुवादक आणि कला समीक्षक होते. विष्णू डे यांची बंगाली भाषेत एक नव्या पद्धतीची संगीतमय काव्यरचना करणारे कवी म्हणून ओळख आहे. त्यांचा जन्म १८ जुलै १९०९ रोजी कोलकाता येथे झाला.

विष्णू डे हे बंगाली भाषेचे महत्त्वपूर्ण कवी, गद्यलेखक, अनुवादक आणि कला समीक्षक होते. विष्णू डे यांची बंगाली भाषेत एक नव्या पद्धतीची संगीतमय काव्यरचना करणारे कवी म्हणून ओळख आहे. त्यांचा जन्म १८ जुलै १९०९ रोजी कोलकाता येथे झाला. कोलकात्याच्या मित्रा इन्स्टिट्यूट आणि संस्कृत कॉलेजिएट स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. १९२७ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यानंतर इंग्रजी विषय घेऊन सेंट पॉल कॅथेड्रल मिशनच्या कॉलेजमधून ते बी. ए. झाले. कोलकाता विद्यापीठातून इंग्रजी विषयात त्यांनी एम.ए. केले आणि अनेक कॉलेजातून इंग्रजीचे अध्यापन केले.

वडिलांच्या प्रोत्साहनामुळे बंगाली व इंग्रजी साहित्याचे विपुल वाचन त्यांनी केले. त्यांचे वडील बंगाली व इंग्रजी साहित्याचे विलक्षण वाचक होते. पुस्तकांनी खच्चून भरलेली कपाटे म्हणजे घरातील मित्रमंडळीच. हवे तितके वाचावे असे घरातूनच उत्तेजन. यामुळे इंग्रजीच नव्हे तर जागतिक साहित्याचे दरवाजे उघडले गेले. मार्क्स व फ्रॉईडच्या विचारांची ओळख झाली. चित्रकला आणि पाश्चात्त्य संगीताचीही त्यांना आवड होती. शाळेत असतानाच त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. त्यांची एकूण ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची सुरुवातीची एक कथा होती. ‘पुरूणेर पुनर्जन्म या लक्ष्मण’ ही कथाप्रगती या ढाक्यातून प्रकाशित होणार्‍या साहित्यविषयक नियतकालिकात १९२८ मध्ये प्रसिद्ध झाली होती.

१९३१ मध्ये परिचय या नियतकालिकाच्या पहिल्या अंकात त्यांच्या दोन कविता प्रसिद्ध झाल्या. ‘उर्वशी ओ आर्टेमिस’(१९३३), ‘चोराबाली’(१९३६), ‘अन्विष्ट’(१९५०), ‘कोमल गान्धार’(१९५३), ‘तुमी शुधु’ ‘पंचिशे बैशाख’ (१९५४), ‘आलेख्य’ (१९५८), ‘स्मृती सत्ता भविष्यत’ (१९६३), ‘उत्तरे भाको मौन’ (१९७७), ‘रूशती पंचशती’, ‘सातभाई चंपा’, ‘संद्वीपेर चर’, ‘एलो मेलो जीवन ओ शिल्पसाहित्य’(१९५८) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन त्यांना अनेक सन्माननीय पुरस्कार मिळाले आहेत. अशा या महान लेखकाचे ३ डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.