सुप्रसिद्ध कथाकार शंकर पाटील

शंकर बाबाजी पाटील यांचा आज स्मृतिदिन. शंकर पाटील हे सुप्रसिद्ध मराठी कथाकार होते. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1926 रोजी हातकणंगले तालुक्यातील (जि. कोल्हापूर) पट्टण-कोडोली येथे झाला. त्यांचे शिक्षण हातकणंगले, गडहिंग्लज व कोल्हापूर येथे बी.ए.बी.टी.पर्यंत झाले. नंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन केले.

Shankar

शंकर बाबाजी पाटील यांचा आज स्मृतिदिन. शंकर पाटील हे सुप्रसिद्ध मराठी कथाकार होते. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1926 रोजी हातकणंगले तालुक्यातील (जि. कोल्हापूर) पट्टण-कोडोली येथे झाला. त्यांचे शिक्षण हातकणंगले, गडहिंग्लज व कोल्हापूर येथे बी.ए.बी.टी.पर्यंत झाले. नंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन केले. त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियुक्ती झाली (१९५७). १९५९ मध्ये एशिया फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला आणि त्यावर त्यांनी ‘टारफुला’ (१९६४) ही पहिली कादंबरी लिहिली.

१९६० ते १९६८ या काळात त्यांच्या कथालेखनाला बहर आला. इयत्ता ८ वी ते १० वी साठी त्यांनी ‘साहित्य सरिता’ या वाचनमालेचे संपादन केले (१९६८). महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषा विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९७२ पासून मराठीशिवाय अन्य सहा भाषांतील पाठ्यपुस्तकांसाठी विद्यासचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘वळीव’ १९५७ मध्ये प्रसिद्ध झाला. नंतर ‘भेटीगाठी’ (१९६०), ‘आभाळ’ (१९६१), ‘धिंड’ (१९६२), ‘ऊन’ (१९६३) , ‘वावरी शेंग’ (१९६३), ‘खुळ्याची चावडी’ (१९६४), ‘पाहुणी’ (१९६७), ‘फक्कड गोष्टी’ (१९७३), ‘खेळखंडोबा’ (१९७४), ‘ताजमहालमध्ये सरपंच’ (१९७७) इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झाले.

वळीव ते ऊनपर्यंत त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहाला त्या वर्षातील उत्तम कथासंग्रह म्हणून महाराष्ट्र राज्याची परितोषिके मिळाली. ‘निवडक शंकर पाटील’ (१९६६) हा त्यांच्या प्रातिनिधिक कथांचा संग्रह. त्यांच्या कथांचे भारतीय पाश्चात्त्य भाषांत अनुवादही झाले. ‘गल्ली ते दिल्ली’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ इ. त्यांची वगनाट्ये लोकप्रिय ठरली. ‘वावटळ’ ही पटकथा लिहून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘गणगौळण’, ‘भोळीभाबडी’, ‘चोरीचा मामला’ इत्यादी चित्रपटांच्या उकृष्ट पटकथा-संवादलेखनाबद्दल त्यांना शासकीय पुरस्कार लाभले. अशा या थोर साहित्यिकाचे 30 जुलै 1994 रोजी निधन झाले.