घरसंपादकीयदिन विशेषलोकमान्य बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

Subscribe

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वांतत्र्य चळवळीतील आघाडीचे नेते होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीला झाला. त्यांचे जन्मनाव केशव, परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी). चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले.

पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्याला झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्याला आले. टिळक १८७६ मध्ये बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी एल.एल.बी ही पदवी घेतली.

- Advertisement -

डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते, तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि ‘केसरी’ (मराठी) व ‘मराठा’ (इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.

प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते. टिळकांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला. केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे निक्षून सांगितले. जनतेत प्रचंड चळवळ उभारून सर्व राष्ट्राची शक्ती राष्ट्रसभेच्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे, असे त्यांचे मत होते. अशा या महान नेत्याचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -