Homeसंपादकीयदिन विशेषAshapurna Devi : बंगाली लेखिका आशापूर्णा देवी

Ashapurna Devi : बंगाली लेखिका आशापूर्णा देवी

Subscribe

आशापूर्णा देवी या प्रसिद्ध बंगाली लेखिका होत्या. त्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी होत्या. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९०९ रोजी कोलकात्यामध्ये एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. तत्कालीन सामाजिक स्थितीमुळे त्या शाळेत जाऊ शकल्या नाहीत, पण घरात त्यांना अक्षर ओळख करून दिली होती.

वसुमती साहित्य मंदिराद्वारा प्रसिद्ध झालेली सगळी पुस्तके तर आशापूर्णादेवींनी वाचली होतीच, पण कालीसिंह लिखित महाभारताची पारायणं केली होती. रवींद्रनाथांच्या अनेक कविता, गीते त्यांना पाठ होत्या. घरामध्ये भाऊ अभ्यास करायला लागला की, ऐकून, ऐकून, त्याच्या पुस्तकात डोकावून, ते धडे, त्या कविता त्यांच्या पाठ होऊन जात असत.

विवाहानंतर पती कालीदास बाबू नाग यांच्या प्रोत्साहनामुळे त्या अविरत लिहीत राहिल्या. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांची ‘बाइ देर डाक’ ही पहिली कविता शिशूसाथी मासिकात प्रसिद्ध झाली. त्यांची दोनशेहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १७८ कादंबर्‍या, ३० कथासंग्रह, ४७ बालवा स्वरूपातील पुस्तके, शिवाय इतर २५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

‘प्रेम ओ प्रयोजन’,‘अग्नि-परीक्षा’,‘छाड़पत्र’,‘प्रथम प्रतिश्रुति’,‘सुवर्णलता’, या काही महत्त्वपूर्ण कादंबर्‍या तर ‘जल और आगुन’,‘और एक दिन’,‘सोनाली संध्या’,‘आकाश माटी’,‘एक आकाश अनेक तारा’,‘सागर सुखाचे जाय’, हे काही महत्त्वाचे कथासंग्रह होत.

पुरोगामी विचारांच्या या लेखिकेला लीला पुरस्कार, कोलकाता विद्यापीठ (१९५४), पद्मश्री (१९७६), ज्ञानपीठ पुरस्कार, हरनाथ घोष पदक, बंगीय साहित्य परिषद (१९८८), जगतरानी स्वर्ण पदक, कोलकाता विद्यापीठ (१९९३) इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा या श्रेष्ठ लेखिकेचे १३ जुलै १९९५ रोजी निधन झाले.