शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना हे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे झाला. प्रामुख्याने शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आणि भावविश्वावर त्यांनी लेखन केले. ‘आनंदाचं झाड’ हे त्यांच्या एका पुस्तकाचे नाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असेच होते. अस्सल डोंबिवलीकर असलेल्या शन्नांनी ठाणे, मुंबई आणि तिथल्या मध्यमवर्गीय आणि पांढरपेशा माणसांच्या दैनंदिन समस्या जवळून पाहिल्या, अनुभवल्या होत्या आणि त्याचे यतार्थ चित्रण त्यांच्या लेखनातून झालेले दिसून येते.
‘तिळा उघड’, ‘जत्रा’, ‘कोवळी वर्षं’, ‘इंद्रायणी’, ‘सखी’, ‘खलिफा’, ‘भांडण‘, ‘बेला’, ‘झोपाळा‘, ‘वारा’, ‘निवडुंग’, ‘परिमिता’, ‘मनातले कंस’, ‘शहाणी सकाळ’, ‘बिलोरी’, ‘मार्जिनाच्या फुल्या’, ‘अनावर’, ‘एकमेक’, ‘मेणाचे पुतळे’, ‘सर्वोत्कृष्ट शन्ना’, ‘तिन्हीसांजा’, ‘शांताकुकडी’, ‘कस्तुरी’, ‘पर्वणी’, ‘झब्बू’, ‘पाऊस’, ‘निवडक’, ‘पैठणी’, असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
‘एक असतो राजा’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘ग्रँड रिडक्शन सेल’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गुंतता हृदय हे’, ‘हवा अंधारा कवडसा’, ‘गहिरे रंग’, ‘गुलाम’, ‘वर्षाव’, ‘रंगसावल्या’, ‘हसत हसत फसवुनी’, ‘मला भेट हवी हो’, ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. ‘घरकुल’, ‘बाजीरावचा बेटा’, ‘बिरबल माय ब्रदर’ (इंग्रजी), ‘कैवारी’, ‘हेच माझं माहेर’, ‘असंभव’ (हिंदी), ‘कळत नकळत’, ‘जन्मदाता’, ‘निवडुंग’, ‘सवत माझी लाडकी’, ‘तू तिथं मी’, ‘झंझावात’ यांसारख्या चित्रपटांच्या कथा त्यांच्या होत्या. पु. भा. भावे पुरस्कार, नाट्यभूषण पुरस्कार, असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले. अशा या प्रतिभावान लेखकाचे २५ सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले.