बुक्कसागर कृष्णय्या श्रीनिवास वर्मा ऊर्फ बी. के. एस. वर्मा हे बंगळुरू येथील एक भारतीय चित्रकार होते. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1948 मध्ये कर्नाटकातील कर्नूर येथे झाला. त्यांची आई जयलक्ष्मी स्वत: एक कलाकार होत्या, तर त्यांचे वडील श्री. कृष्णमाचार्य संगीतकार होते. वर्मा यांना कलामंदिर, बंगळुरू येथे गुरु श्री. ए.एन. सुब्बाराव आणि देवेनहल्ली येथील शिल्पकार ए.सी.एच. आचार्य यांच्याकडून चित्रकला आणि शिल्पकलेचे प्रशिक्षण मिळाले.
त्यांनी संपूर्ण भारतभर दोनदा प्रवास करून डॉ. राधाकृष्ण (भारताचे माजी राष्ट्रपती), देवीप्रसाद रॉय चौधरी, जैमिनी रॉय, नंदल बोस, के.के. हेब्बर, एम.एफ. हुसेन, पणिकर, राष्ट्र कवी कुवेम्पू, शिवराम कारंथ आणि इतर अनेक लोकांची भेट घेतली. त्यांनी या क्षेत्रातील अधिक ज्ञान आणि अनुभव मिळविण्यासाठी अजिंठा, वेरूळ आणि अनेक कला संग्रहालये आणि गॅलरींना भेट दिली.
1988 साली रशिया उत्सवात भारतीय महोत्सवासाठी त्यांच्या दोन चित्रांची निवड झाली. त्यांनी 1997 मध्ये कुवेतमधील राजदूत भवन येथे ‘आर्ट फॉर्म्युला’ या कार्यक्रमात त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन केले होते. त्यांना बहरीनचे राजा – बिन खलीफा यांच्या ‘बहरीन पीस 2000’ या कार्यक्रमामध्ये त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली होती.
त्यांनी लंडनमधील ‘नेहरू सेंटर’ येथेही त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन केले. बी. के. एस. वर्मा यांना 1986 साली ‘राज्य ललितकला अकादमी पुरस्कार’, 2001 साली राज्योत्सव पुरस्कार तर 2001 साली कर्नाटक सरकारने ‘कर्नाटक राज्य पुरस्कार’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले. बी. के. एस. वर्मा यांचे 6 फेब्रुवारी 2023 रोजी निधन झाले.