कुसुमावती आत्माराम देशपांडे या श्रेष्ठ कथालेखिका आणि समीक्षक होत्या. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १९०४ रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई, नागपूर व लंडन विद्यापीठात झाले. बी. ए. (ऑनर्स) झाल्यावर नागपूर महाविद्यालयात १९३१ ते १९५५ पर्यंत त्यांनी इंग्लिशचे अध्यापन केले. नंतर आकाशवाणीच्या स्त्री व बालविभागाच्या निर्मितीप्रमुख म्हणून काम केले. श्रेष्ठ मराठी कवी अनिल (आ. रा. देशपांडे) यांच्याशी त्यांचा १९२९ मध्ये प्रेमविवाह झाला. उभयतांच्या प्रेमजीवनाचे दर्शन घडविणारा पत्रव्यवहार कुसुमानिल (१९७२) या नावाने प्रसिद्ध झालेला आहे.
हा पत्रव्यवहार मराठीत तरी अपूर्व आहे. १९३१ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या ‘किर्लोस्कर’मध्ये त्यांची ‘मृगाचा पाऊस’ ही कथा प्रसिद्ध झाली. ती त्यांची पहिली कथा होय. त्यांनी एकूण ४८ कथा लिहिल्या. ‘दमडी’, ‘चिंधी’, ‘कला धोबिणीचे वैधव्य’, ‘लहरी’, ‘गवताचे पाते’ अशा त्यांच्या काही कथा आहेत. ‘प्रतिभा’, ‘ज्योत्स्ना’, ‘अभिरुची’ व ‘सत्यकथा’ या नियतकालिकांशी त्यांचा संबंध राहिला. त्यांच्या कथांमधून तत्कालीन सामाजिक वास्तवाचे व विशेषतः सर्वसामान्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचे अल्पाक्षरी पण चित्रमय शैलीत वेधक चित्रण आढळते.
मध्यमवर्गीय जीवनाचीही चित्रे त्यांनी समर्थपणे रंगवली. ‘दीपकळी’ (१९३५), ‘दीपदान’ (१९४१), ‘मोळी’ (१९४६), ‘दीपमाळ’ (१९५८), असे चार लघुकथासंग्रह प्रकाशित झाले. अनुभवांचे निवेदन अपरिहार्य वाटल्यावरच त्यांनी कथा लिहिल्या. निसर्ग आणि मानवी जीवन यांतील संबंधांचा त्यांनी आपल्या कथांतून शोध घेतला. तंत्रापेक्षा कथेचा विषय व त्याविषयीचा आपला दृष्टिकोण यांना महत्व दिल्याने त्यांच्या कथांना वेगळेपणा लाभला. अशा या श्रेष्ठ लेखिकेचे १७ नोव्हेंबर १९६१ रोजी निधन झाले.