प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये हे मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते होते. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९२६ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. त्यांनी १९४८ मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. पदवी संपादन केल्यानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर ३ वर्षे ते माध्यमिक शाळेत शिक्षक होते. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे ४ वर्षे आणि एलआयसीत ४ महिने त्यांनी कारकुनी केली. भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक होते. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे.
मुंबईसारख्या विविधांगी व मिश्र संस्कृती असलेल्या शहरात संक्रमण काळात झालेले बदल व त्याचा समाजातील सर्वच स्तरावर विशेषत: तरुण पिढीवर झालेल्या परिणामांना त्यांनी आपल्या लेखनातून अभिव्यक्ती दिली. त्यांनी ‘वासूनाका’, ‘अग्रेसर’, ‘राडा’ या कादंबर्या लिहिल्या. त्यांनी ‘राडा’ कादंबरीत मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत.
‘ऑपरेशन छक्का’(नाटक १९६९), ‘एक सुन्हेरे ख्वाब’ (कथासंग्रह १९८०), ‘करंटा’(कादंबरी १९८१), ‘गुरुदत्त’ (चरित्र १९९०), ‘डोंबार्याचा खेळ’ (कथासंग्रह १९६७), ‘पिचकारी’ (विनोदी कथा १९७९), ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’(कादंबरी १९६७), ‘मुरगी’(कथासंग्रह १९८१), ‘वॉर्ड नंबर ७-सर्जिकल’ (कादंबरी १९८०), ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या ‘वैतागवाडी’ कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९६५, ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’ कादंबरीसाठी ‘ललित’ पुरस्कार, १९६८, इत्यादी पुरस्कार मिळाले. अशा या वास्तववादी कादंबरीकाराचे ३० ऑक्टोबर १९९६ रोजी निधन झाले.