आरमाराचे प्रमुख दर्यासारंग कान्होजी आंग्रे

Chief of the Armada Daryasarang Kanhoji Angre

कान्होजी आंग्रे यांचा आज स्मृतिदिन. कान्होजी आंग्रे हे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराची स्थापना केली. त्यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी संकपाळ कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्ला पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समुद्री सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.

१६९८ मध्ये कोल्हापूरच्या भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन मुंबईपासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहरच्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला. कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.

कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खासगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला. २६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली. अशा या कर्तृत्ववान योद्ध्याचे ४ जुलै, १७२९ रोजी निधन झाले.