शिरीषकुमार यांचा आज स्मृतिदिन. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता.अशाच एका क्रांतिकारकाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे नाव शिरीषकुमार. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजी नंदूरबार याठिकाणी झाला. शिरीषकुमार यांचे आई-वडील दोघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांची आई सविताबेन या राष्ट्र सेवा दल या स्थानिक संघटनेच्या अध्यक्षा होत्या, तर वडील पुष्पेंद्रभाई नंदूरबारमधील काँग्रेस कमिटीचे नेते होते. त्यामुळे देशप्रेमाचे वातावरण असलेल्या घरात शिरीषकुमार लहानाचे मोठे होत होते.
महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना ‘चले जाव’चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेर्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेले शिरीषकुमार सहभागी झाले होते. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमार यांच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकाने ते आवाहन झुगारले.
अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलीस अधिकार्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा शिरीषकुमार यांनी सुनावले, ‘गोळी मारायची तर मला मार!’. संतापलेल्या पोलीस अधिकार्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीष यांच्या छातीत बसल्या आणि ते जागीच कोसळले. त्यांच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.