Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयदिन विशेषChintaman Ganesh Kolhatkar : अभिनेते, नाट्यनिर्माते चिंतामणराव कोल्हटकर

Chintaman Ganesh Kolhatkar : अभिनेते, नाट्यनिर्माते चिंतामणराव कोल्हटकर

Subscribe

चिंतामणराव गणेश कोल्हटकर हे मराठी नट आणि नाट्यनिर्माते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे या गावी झाला. सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले. १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्भुत असाच आहे.

कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले. राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली.

चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या. गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला. त्यांची वसंतसेना (इ.स. १९४२) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते.

चिंतामणराव कोल्हटकर हे १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५व्या, आणि १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला. चिंतामणरावांनी लिहिलेल्या ‘बहुरुपी’ नामक आत्मचरित्राला १९५८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.