रोहिणी गणेश भाटे या ज्येष्ठ कथ्थक नृत्य कलाकारांपैकी एक होत्या, ज्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचा कलाकार, शिक्षिका, लेखक, संशोधक आणि समीक्षक म्हणून विकास केला. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९२४ रोजी बिहार राज्यात पाटणा येथे झाला. त्यांनी मराठी, संस्कृत हे विषय घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी मिळवली.
जयपूर घराण्यातील ख्यातनाम गुरू पं. मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे लखनौला रोहिणीताई विद्याग्रहण करू लागल्या. संगीताच्या आवडीमुळे त्या केशवराव भोळे आणि वसंतराव देशपांडे यांच्याकडे गायन शिकल्या. त्यानंतर त्यांनी पं. लच्छू महाराज यांच्याकडे कथकचे शिक्षण घेतले.
पं. लच्छू महाराज हे लखनौ घराण्यातील नामवंत नर्तक व गुरू होते. भारताबाहेरही पूर्व जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, आफ्रिका, अमेरिका व कॅनडा, व्हिएतनाम, इंग्लंड व जपान दौरे अतिशय यशस्वीपणे पार पाडून रोहिणी भाटे ख्यातनाम सुप्रसिद्ध कलाकार म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त झाल्या.
रोहिणी भाटे यांनी ‘माझी नृत्यसाधना’, ‘कथक दर्पण दीपिका’ व ‘लहेजा’ या पुस्तकांचे लेखन केले. अमेरिकन नृत्यकर्मी इझाडोरा डंकन हिच्या आत्मवृत्ताचा ‘मी इझाडोरा’ हा त्यांनी केलेला अनुवाद गाजला होता. त्यांना १९७७ साली नृत्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य’ पुरस्कार, १९७९ साली ‘संगीत नाटक अकॅडमी’, ‘महाराष्ट्र गौरव’ (१९९०), ‘जीवनसाधना गौरव’ (१९९९) आणि ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार १९९४ साली मिळाला.
२००२ साली ‘कालिदास’ सन्मान, तर २००४ साली डेक्कन कॉलेजतर्फे त्यांना ‘डी.लिट.’ ही पदवी प्राप्त झाली. २००६ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा ‘रत्न’ पुरस्कारही मिळाला. रोहिणी भाटे यांचे १० ऑक्टोबर २००८ रोजी पुण्यात निधन झाले.