Homeसंपादकीयदिन विशेषVasant Sabnis : विनोदकार, नाटककार वसंत सबनीस

Vasant Sabnis : विनोदकार, नाटककार वसंत सबनीस

Subscribe

रघुनाथ दामोदर सबनीस ऊर्फ वसंत सबनीस हे मराठी विनोदकार आणि नाटककार होते. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी सोलापूर येथे झाला. ते पंढरपूरच्या लोकमान्य हायस्कूलमधून मॅट्रिक (१९४२), पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. (१९४६) झाले. शासकीय नोकरीत असताना ते साहित्यनिर्मितीही करीत. त्यांच्या कविता अभिरूचीसारख्या दर्जेदार नियतकालिकातून प्रसिद्ध होत. पुढे ते विनोदी लेखक म्हणून प्रसिद्धीला आले.

रंगभूमीवर त्यांची नाटकेही गाजली. ‘पानदान’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह १९५८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांपैकी ‘चिल्लरखुर्दा’ (१९६०), ‘भारूड’ (१९६२), ‘मिरवणूक’ (१९६५), ‘पंगत’ (१९७८), ‘आमची मेली पुरुषाची जात’ (२००१) हे प्रसिद्घ लेखसंग्रह होत. ‘आत्याबाईला आल्या मिशा’ (१९८५), ‘विनोदी द्वादशी’ (१९८८), ‘बोका झाला संन्यासी’ (२००१) हे त्यांचे काही विनोदी कथासंग्रह. ‘विच्छा माझी पुरी करा’ (१९६८) या त्यांच्या लोकनाट्याने यशस्वितेचा विक्रम केला.

ते प्रथम वीणा मासिकातून ‘छपरी पलंगाचा वग’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. तमाशा या लोककला प्रकाराला आधुनिक रूप देण्याचा पहिला महत्त्वाचा प्रयत्न म्हणून हा वग उल्लेखनीय ठरतो. दादा कोंडके, राम नगरकर या अभिनेत्यांची सबनीसांच्या उत्कृष्ट, चुणचुणीत संवादांना समर्थ साथ मिळाली. मार्मिक राजकीय भाष्य आणि चतुर संवाद हे या लोकनाट्याचे वैशिष्ठ्य. त्यांच्या दोन विनोदी नाट्यकृतींना १९६३ व १९७२ चे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार मिळाले. ते किशोर मासिकाचे संपादक होते. अशा या श्रेष्ठ नाटककाराचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.