दिगंबर बाळकृष्ण मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. दि. बा. मोकाशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1915 रोजी रायगड जिल्ह्यात उरण येथे झाला. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी खासगी संस्थेतून अभियांत्रिकीमधील पदविका घेतली. 1941 ते 1981 सालापर्यंत त्यांनी 140 च्यावर कथा लिहिल्या. त्यांचे एकूण अकरा कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
त्यांपैकी ‘कथामोहिनी’, ‘लामणदिवा’, ‘आमोद सुनासि आले’, ‘वणवा’, ‘चापलूस’, ‘एक हजार गाई’, ‘आदिकथा’, ‘माउली’, ‘तू आणि मी’, ‘जरा जाऊन येतो’ हे काही आहेत. त्यांनी ‘स्थलयात्रा’, ‘पुरुषास सर्व गुन्हे माफ’, ‘देव चालले’, ‘आनंदओवरी’, ‘वात्स्यायन’ या कादंबर्या लिहिल्या. त्यांपैकी ‘आनंदओवरी’ व ‘वात्स्यायन’ या चरित्रात्मक कादंबर्या असून अनुक्रमे संत तुकाराम आणि वात्स्यायन यांचे भावजीवन त्यात रेखाटलेले आहे.
‘पालखी’, ‘अठरा लक्ष पावले’ ही प्रवासवर्णनात्मक पुस्तके आहेत. ‘गुपित’, ‘जगाच्या कोलांट्या’, ‘अंधारदरी’ ही मुलांसाठी लिहिलेली पुस्तके आहे. मराठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या संस्कार वाचनमालेत त्यांच्या बालकांसाठीच्या कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. रेडिओ दुरुस्तीवरील त्यांचे पुस्तक, ‘यंत्र व तंत्र’ व ‘जमीन आपली आई’ ही विज्ञानविषयक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.
विज्ञानकथा, कुमारकथा, प्रवासवर्णन, कादंबरी इ. विविध वाङ्मयप्रकार हाताळूनही दि.बा.अभिजात कथाकार म्हणूनच अधिक ओळखले जातात. विज्ञानकथा हा शब्द रूढ होण्याअगोदर ‘रेडिओची गोष्ट’, ‘शाश्वती’, ‘ग्रहयोग’सारख्या विश्वाबाहेरची वस्ती, ग्रहमाला, अंतराळ वगैरे शास्त्रीय अस्तर असलेल्या कथा त्यांनी लिहिल्या. दि. बा. मोकाशी यांचे 29 जून 1981 रोजी निधन झाले.