दत्तात्रेय शंकर डावजेकर ऊर्फ दत्ता डावजेकर हे एक कुशल संगीतकार होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना ‘डीडी’ या टोपणनावानेही ओळखले जाई. हिंदी चित्रपटसृष्टीला लता मंगेशकर यांची ओळख त्यांनीच करून दिली. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. दत्ता पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात मॅट्रिकपर्यंत शिकले. ‘म्युनिसिपालिटी’ या चित्रपटाने 1941 साली त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात झाली.
त्यांचा दुसरा चित्रपट होता सरकारी पाहुणे (1942). रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, जुने ते सोने, संथ वाहते कृष्णामाई, यशोदा आणि वाट पाहते पुनवेची, तू आहेस तरी कोण?, शिवरायांची सून ताराराणी आणि युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट. त्यांच्या ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या प्रचंड लोकप्रिय गाण्याच्या ध्वनिमुद्रिकांच्या विक्रीतून आलेली रक्कम सैन्यदलासाठी देण्यात आली.
लता मंगेशकरांनी गायलेली डावजेकरांची पहिली सांगीतिक रचना 1943 साली ‘माझे बाळ’ या चित्रपटासाठी ध्वनिमुद्रित झाली. त्यांनी अनुराधा पौडवाल यांनादेखील ‘यशोदा’ चित्रपटात, तर सुधा मल्होत्रा यांनाही ‘प्रिझनर ऑफ गोवळकोंडा’ या चित्रपटात पार्श्वगायनाची पहिली मोठी संधी दिली.
अनेक मराठी नाटकांना, 50 मराठी चित्रपटांना व 2 हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ‘रंगल्या रात्री अशा’, ‘पाठलाग’ , ‘संथ वाहते कृष्णामाई’ व ‘धरतीची लेकरं’ या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार, तर ‘यशोदा’ या चित्रपटाला शास्त्रीय संगीताचा सूरसिंगार पुरस्कार मिळाला आहे. 1995 सालचा महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार त्यांना मिळाला. डावजेकरांचे 19 सप्टेंबर 2007 रोजी निधन झाले.