देवदत्त रामकृष्ण भांडारकर हे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ आणि एपिग्राफिस्ट होते. त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) मध्ये काम केले. ते प्रख्यात भारतशास्त्रज्ञ आरजी भांडारकर यांचे पुत्र होते. देवदत्त भांडारकर यांचा जन्म पुणे येथे 19 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. इतिहासात पदवी घेतल्यानंतर भांडारकर एएसआयमध्ये रुजू झाले.
देवदत्तांच्या संशोधनातून एन्शंट हिस्टरी ऑफ इंडिया (1918), द गाइड टू एलिफंटा केव्ह (1911), लेक्चर्स ऑन एन्शंट इंडियन न्युमॅस्मेटिक्स (1921), अशोक (कारमायकेल लेक्चर्स) 1925, लिस्ट ऑफ इन्स्क्रीप्शन्स ऑफ नॉर्दन इंडिया 1927, सम ऑस्पेक्ट्स ऑफ एन्शंट हिंदु पॉलिटी 1929, सम ऑस्पेक्ट्स ऑफ एन्शंट इंडियन कल्चर, असे महत्त्वाचे ग्रंथ एकापाठोपाठ निर्माण झाले. त्याशिवाय सुमारे पन्नास शोधनिबंध त्यांनी वेगवेगळ्या परिषदांतून सादर केले. बी.सी.लॉ. व्हाल्यूम, अशोक इन्स्क्रीप्शन्स, पुरातत्त्वीय संशोधनाचे रिपोर्ट, केशव मिश्राची तर्कभाषा, तीर्थकल्प इत्यादी ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले.
त्यांनी कित्येक वर्षे इंडिया, इंडियन अॅन्टीक्वरी, इंडियन कल्चर या संशोधनात्मक नियतकालिकांचे संपादन केले होते. पुरातत्त्वशास्त्र, नाणकशास्त्र, लिपिशास्त्र, प्राचीन भूगोल, मूर्तिशास्त्र, साहित्य, राजकीय इतिहास इत्यादी विषयांवर पन्नासहून अधिक लेख त्यांनी प्रसिद्ध केले. याशिवाय विविध परिषदांतील अध्यक्षीय भाषणे, ग्रंथ समीक्षणे याच्याही बर्याच नोंदी आढळतील.
कोलकाता विद्यापीठात अध्यापन-संशोधन करत असताना ‘कार्मायकेल व्याख्यानमाला’ त्यांनी सुरू केली. एवढ्या प्रचंड व्यासंगानंतर त्यांना एशियाटिक सोसायटी कोलकाता व लंडन यांचे सदस्यत्व, कोलकाता विद्यापीठाची सन्मान्य डॉक्टरेट (1921), विमल चरण लॉ सुवर्णपदक, इत्यादी सन्मान मिळाले. अशा अभ्यासू इतिहास संशोधकाचे 13 मे 1950 रोजी निधन झाले.