Homeसंपादकीयदिन विशेषPhilosopher : तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. सुरेंद्र बारलिंगे

Philosopher : तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. सुरेंद्र बारलिंगे

Subscribe

डॉ. सुरेंद्र बारलिंगे हे तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म २० जुलै १९१९रोजी नागपुरात झाला. १९३४ साली त्यांनी मॉरिस कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली. ते सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांना भारतातच नव्हे, तर युगोस्लाव्हिया, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, बेलग्रेड, इंग्लंड अशा देशांत व्याखानांसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

इंग्लंड आणि युगोस्लाव्हियामधल्या वास्तव्यात अनुभवलेला निसर्ग आणि पाहिलेल्या माणसांच्या पैलूंचं त्यांनी ‘ओंजळभर पाणी’ या आपल्या आत्मकथनात फार सुंदर वर्णन केलं आहे.‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी’ या अमळनेरच्या संस्थेत ते ‘फेलो’ म्हणून रुजू झाले. १९४२ ते १९४५ या काळात ‘भारत छोडो’ चळवळीत त्यांचा सहभाग होता. पुढे छत्तीसगड कॉलेज, हैदराबाद व नांदेड येथील महाविद्यालयात १९५० ते १९५८ या काळात त्यांनी अध्यापन केले.

- Advertisement -

१९६२ साली युगोस्लाव्हियातील झागरेब विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर त्यांनी पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुखपद सांभाळले. १९८१ ते १९८७ या काळात ते ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष होते. त्यांच्या नावावर १३ मराठी, ६ हिंदी, ८ इंग्रजी पुस्तके आहेत. ‘क्रांतिपूजा’, ‘सौंदर्याचे व्याकरण’, ‘तर्करेखा’ या तत्त्वज्ञानविषयक पुस्तकांव्यतिरिक्त, ‘मी पण माझे’ ही कादंबरी, ‘माझे घर माझा देश’, ‘गोष्टीचं गाठोडं’ हे कथासंग्रह; ‘पुन्हा भेटू या’, ‘आभाळाच्या सावल्या’ हे ललितलेखसंग्रह आहेत.

त्यांनी ‘इंडियन फिलॉसॉफिकल क्वार्टरली’ (परामर्श) आणि ‘थिंकर्स अकॅडमी जर्नल’ (ताज) ही नियतकालिके सुरू केली. तत्त्वज्ञान या विषयाचे त्यांचे अनेक निबंध वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांचे १९ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -