Eco friendly bappa Competition
घर संपादकीय दिन विशेष ख्यातनाम कादंबरीकार शिवाजी सावंत

ख्यातनाम कादंबरीकार शिवाजी सावंत

Subscribe

शिवाजी सावंत यांचा आज स्मृतिदिन. ते ख्यातनाम मराठी कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी कोल्हापूरमधील आजरा येथे झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आजर्‍यालाच झाले. प्रथम वर्ष बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन पुढे वाणिज्य शाखेतून पदविका घेतली. त्यानंतर कोल्हापूरच्या ‘राजाराम प्रशाले’त त्यांनी अध्यापन केले (१९६२-७४). १९७४ मध्ये ते पुण्यास स्थायिक झाले. तेथे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याच्या लोकशिक्षण या मासिकाचे संपादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९८३ मध्ये या मासिकाच्या संपादकपदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
शिवाजी सावंत ‘राजाराम प्रशाले’त अध्यापन करीत असतानाच त्यांनी ‘मृत्युंजय’ (१९६७) ही आपली पहिली कादंबरी लिहिली. या कादंबरीत कर्णाच्या अंतरंगात शिरून त्याच्या मनोविश्वाचा शोध घेण्याचा प्रगल्भ प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या या पहिल्याच कादंबरीने प्रभावी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. ‘छावा’(१९७९) आणि ‘युगंधर’(२०००) या त्यांच्या त्यानंतरच्या कादंबर्‍या लिहिल्या.
या साहित्यकृतींच्या व्यतिरिक्त सावंत यांनी जे लेखन केले, त्यांत ‘लढत’(दोन भाग-१९८६) आणि ‘संघर्ष’(१९९५) या दोन जीवनकहाण्यांचा अंतर्भाव होतो. ‘अशी मने असे नमुने’(१९७५) आणि ‘मोरावळा’(१९९८) मध्ये त्यांनी वेगवेगळ्या माणसांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत.
सावंत यांना अनेक साहित्य पुरस्कार आणि सन्मान मिळाले. महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७), न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२), भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (१९९५), फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६), आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८). बडोदे येथे १९८३ मध्ये भरलेल्या ‘बडोदे मराठी साहित्यसंमेलना’चे ते अध्यक्ष होते. अशा या महान साहित्यिकाचे १८ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -