घर संपादकीय दिन विशेष ख्यातनाम कवयित्री अमृता प्रीतम

ख्यातनाम कवयित्री अमृता प्रीतम

Subscribe

अमृता प्रीतम या आधुनिक कालखंडातील एक ख्यातनाम पंजाबी कवयित्री होत्या. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी गुजाराणवाला (पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे मूळ नाव अमृतकौर असून पतीचे नाव प्रीतम सिंह कातवाडा आहे. फाळणीची झळ बसून त्यांना लाहोर सोडून दिल्लीस यावे लागले. दिल्ली येथे आकाशवाणीवर त्यांनी १९४८ ते १९६० पर्यंत ‘स्टाफ आर्टिस्ट’ म्हणून नोकरी केली. या काळात त्यांनी आकाशवाणीसाठी गीत, रूपक इत्यादी स्वरूपाचे लेखन केले आहे. त्यांचे वडील कर्तार सिंह हितकारी हे कवी होते. त्यांच्या काव्याचा प्रभाव पडून वयाच्या सोळाव्या वर्षांपासून त्यांनी काव्यरचनेस आरंभ केला.

सुरुवातीची त्यांची रचना पारंपरिक होती. तथापि लवकरच स्वतःच्या प्रगाढ अनुभूतीमुळे व वैयक्तिक भावना व्यक्त करण्याच्या उत्कट इच्छेमुळे त्यांच्या काव्यात एक परिवर्तन घडून आले. स्त्रियांची बाजू त्या हिरीरीने मांडू लागल्या. स्त्रीजातीवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला व पारंपरिक मूल्यांविरुद्ध बंड पुकारले. त्यांचे बारा-तेरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काव्यातील ओज हा गुण वास्तव परिस्थिती तसेच सर्व प्रकारची दडपशाही व बंधने यांविरुद्ध बंड करण्याच्या त्यांच्या दुर्दम्य इच्छेमधून आलेला आहे.

- Advertisement -

प्रेम हा त्यांच्या काव्याचा केंद्रबिंदू आहे मग हे प्रेम आत्मनिष्ठ असो की मानवजातीचे असो. उच्च श्रेणीतील कादंबरीकार म्हणूनही त्या पंजाबी साहित्यात विख्यात आहेत. त्यांच्या आतापर्यंत सहा-सात कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत. शैलीदृष्ठ्या या सर्व कादंबर्‍या काव्यात्म आहेत. आरंभीच्या कादंबर्‍यांतून भारतीय स्त्रियांवरील शतकानुशतकांच्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली आहे. अशा या महान कवयित्रीचे ३१ ऑक्टोबर २००५ रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -