घरसंपादकीयदिन विशेषप्रख्यात गायक बडे गुलाम अली खाँ

प्रख्यात गायक बडे गुलाम अली खाँ

Subscribe

बडे गुलाम अली खाँ हे अखिल भारतीय कीर्तीचे पतियाळा घराण्याचे प्रख्यात गायक होते. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1902 रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे घराणे गायकवादकांचे असून ते मूळ कसूर (जि.लाहोर) गावचे राहणारे होते. पतियाळा घराण्याच्या आकर्षक व विविध अंगांनी परिपूर्ण अशा गायकीचा परिचय भारतात सर्वत्र करून देण्यात बडे गुलाम अली खाँ यांचा वाटा फार मोठा आहे. त्यांचे वडील अलीबक्ष व चुलते काले खाँ हे दोघेही पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक फतेह अली यांचे शिष्य. अलीबक्ष गायनही करीत व दिलरूबाही उत्तम तर्‍हेने वाजवीत असत.

अलीबक्ष काश्मीरच्या महाराजांचे दरबारी गायक होते. बडे गुलाम अली खाँ व त्यांचे कनिष्ठ बंधू बरकत अली खाँ हे दोघेही वडिलांजवळच संगीताचे पहिले पाठ शिकले. १९१९ मध्ये लाहोर संगीत संमेलनात त्यांनी पहिल्यांदा जाहीर गायन केले. गुलाम अली खाँ यांचा आवाज गोड व ग्रहणशक्ती तीव्र असल्यामुळे ते वयाच्या विसाव्या वर्षांपासूनच उत्तम तर्‍हेने गाऊ लागले. त्यानंतर कोलकाता व अलाहाबाद येथील संगीत संमेलनातील त्यांचे सादरीकरण गाजले. स्वतंत्र मैफली करून, गायक म्हणून त्यांना १९२७ नंतर कीर्ती मिळू लागली.

- Advertisement -

पंजाबमधील तसेच कोलकाता येथील संगीत परिषदांमध्ये १९४०-४२ पर्यंत त्यांनी चांगलेच नाव कमविले. १९४४ साली भरलेल्या ‘विक्रम संगीत परिषदे’त त्यांनी आपल्या कलेने मुंबईकरांना थक्क करून सोडले. देशाच्या फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले होते, मात्र पुन्हा ते भारतात परतले व मुंबईत येऊन राहिले. ख्याल, ठुमरी, भजने इत्यादी प्रकार सारख्याच समर्थपणाने व गोडव्याने गाणारे सर्वढंगी व अद्वितीय गायक म्हणून त्यांची कीर्ती सर्व देशभर पसरली. विशेषतः पंजाबी ढंगाचे ठुमरी गायक म्हणून त्यांचा खास लौकिक होता. अशा या महान गायकाचे २३ एप्रिल १९६८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -