यू. आर. अनंतमूर्ती यांचा आज स्मृतिदिन. यू. आर. अनंतमूर्ती हे भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कन्नड साहित्यिक होते. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी कर्नाटकातील मेलिगे येथे झाला. त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात दूरवासपुरामधील एका संस्कृत विद्यालयातून केली. त्यानंतर त्यांनी इंग्रजी आणि तुलनात्मक साहित्य या संबंधातील शिक्षण म्हैसूर आणि बर्मिंघम (इंग्लंड) येथून घेतले.
१९६६ मध्ये त्यांनी बर्मिंघम विश्वविद्यालयातून ‘१९३० मधील राजकारण आणि साहित्य’ या विषयावर शोधप्रबंध सादर करून पी. एच. डी. ही पदवी प्राप्त केली. १९८० मध्ये म्हैसूर विश्वविद्यालयात ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९८२ मध्ये शिवाजी विश्वविद्यालयात तसेच १९८५ मध्ये आयावो विश्वविद्यालयात ते व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून त्यांनी कार्य केले.
अनंतमूर्ती यांनी ‘एन्देन्दु मुगियद कथे’ (१९५५), ‘प्रश्ने’ (१९६४), ‘मौनी’ (१९७२), ‘आकाश मट्टू बेक्कु’ (१९८१), ‘एरडु दशकदा कथेगळु’ (१९८१), ‘संस्कार’ (१९६५), ‘भारतीपुरा’ (१९८३), ‘अवस्थे’ (१९७८), ‘भव’ (१९७७), ‘मिथुन’ (१९९२), ‘सन्निवेश’ (१९७४), ‘प्रज्ञे मत्तु परिसर’ (१९७४), ‘पूर्वापार’ (१९८९) इत्यादी पुस्तके लिहिली. अनंतमूर्ती यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, बांग्ला, मराठी, मल्याळम, गुजराती अशा अनेक भारतीय भाषांव्यतिरिक्त इंग्रजी, रूसी, फ्रेंच, हंगेरियन इत्यादी विदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत.
त्यांच्या अनेक साहित्यकृतींवर चित्रपट आणि नाटके सादर करण्यात आली आहेत. त्यांची पहिली कादंबरी संस्कार एक अशी विलक्षण साहित्यकृती आहे की, जिला आधुनिक भारतीय साहित्यातील एक चिरंतन रचना म्हणून मान्यता मिळाली. अशा या महान साहित्यिकाचे २२ ऑगस्ट २०१४ रोजी निधन झाले.