शांताराम राजाराम वणकुद्रे ऊर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माते, दिग्दर्शक, नट व पटकथाकार होते. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त १९२१ साली ‘सुरेखा हरण’, ‘सावकारी पाश’ या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली आणि १९२७ साली त्यांनी ‘नेताजी पालकर’ हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.
त्यांनी ‘गोपाळ कृष्ण’, ‘राणी साहेबा’, ‘खुनी खंजर’, ‘उदयकाल’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. ‘प्रभात’चा पहिला मराठी बोलपट ‘अयोध्येचा राजा’ १९३२ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘अमृतमंथन’ हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. ‘संत तुकाराम’ (१९३७) या बोलपटाची भारतात-विशेषत: महाराष्ट्रात आणि सातासमुद्रापार कीर्ती गेली.
व्हेनीस चित्रपट महोत्सवात दाखविला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘रानी साहेबा’ (१९३१) हा चित्रपट भारतातला पहिला बालपट होता. ‘कुंकू’ (दुनिया ना माने), ‘माणूस’(आदमी) आणि शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले.
शांताराम बापूंनी १९४२ साली ‘राजकमल कला मंदिर’ या स्वत:च्या संस्थेची स्थापना केली. ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, ‘अमर भूपाळी’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’ आणि ‘नवरंग’ हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. ‘पिंजरा’ (१९७२) या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले.
महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम बापूंना ‘चित्रपती’ ही पदवी दिली. १९८५ साली त्यांंना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर १९९२ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. अशा या महान दिग्दर्शकाचे ३० ऑक्टोबर १९९० साली मुंबईत निधन झाले.