घरसंपादकीयदिन विशेषमुंबईचे पहिले पोलीस उपायुक्त कावसजी

मुंबईचे पहिले पोलीस उपायुक्त कावसजी

Subscribe

कावसजी जमशेदजी पेटीगारा यांचा आज स्मृतिदिन. कावसजी पेटीगारा हे मुंबईचे पहिले पोलीस उपायुक्त होते. त्यांचा जन्म २४ नोव्हेंबर १८७७ रोजी गुजरातमधील सूरत येथे झाला. त्यांचे शिक्षण प्रथम सुरतेत आणि नंतर मुंबईत झाले. कुठल्याही प्रकारचे पोलीस खात्याचे शिक्षण नसताना १९०३ साली ‘वर्दी’ नसलेले, साध्या कपड्यांमध्ये ते पोलीस भरती झाले. ते भरती झाल्यावर ६ वर्षांनी १९०९ मध्ये सीआयडी हा नवा विभाग सुरू झाला.

सीआयडी खात्याचे दोन उपविभाग होते. गुन्हेगारी आणि राजकीय. यापैकी राजकीय उपविभागात कावसजींची नियुक्ती उपनिरीक्षक या पदावर झाली. विशेष शिक्षण नसूनही कावसजींना एकदम उपनिरीक्षक पदावर नियुक्त केले गेले त्यामागे एक विशेष कारण होते. त्यांना मुंबई शहराबाबतची असलेली बारीक तपशिलातली माहिती आणि दुसरे म्हणजे कुठे काय चाललंय याची बित्तंबातमी काढण्यात त्यांचा हात धरणारा कुणी नव्हता. कावसजींच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना बढत्याही भराभर मिळत गेल्या.

- Advertisement -

१९२० मध्ये ते सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस (स्पेशल ब्रँच) झाले. मूळच्या इराणी असलेल्या पारशी समाजातील लोकांनी भारतीय संस्कृतीत समरस होऊन त्यातील अनेक व्यक्तींनी व्यापार, उद्योग, कलाक्षेत्र, सरकारी नोकर्‍या यांत पूर्वापार आपल्या कौशल्याने वेगळा ठसा उमटवला. याच समाजातील कावसजी पेटीगारा हे १९२८ साली मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्त झाले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, शौर्य या गुणांची पारख करून ब्रिटिश सरकारने १९१६ साली त्यांना ‘खान बहादूर’ हा खिताब देऊन गौरव केला. अशा या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍याचे २८ मार्च १९४१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -