घरसंपादकीयदिन विशेषभारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

Subscribe

डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा आज स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते एक थोर नेते आणि भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी बिहारमधील जीरादेई या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरीच पारंपरिक पद्धतीने झाले. त्यात उर्दू आणि फार्सी या भाषाशिक्षणावर अधिक भर होता. पुढे छपरा, हथवा व पाटणा या ठिकाणी शालेय शिक्षण घेऊन त्यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून बीए (१९०६), एमए (१९०८), बीएल (१९०९) व एमएल (१९१५) या पदव्या मिळविल्या.

सुरुवातीस काही वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले आणि नंतर कोलकाता उच्च न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला (१९११). काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले (१९०६). पाटणा नगरपरिषदेचे ते अध्यक्षही होते. ते पुढे १९११ मध्ये काँग्रेसचे सभासद झाले. बिहारच्या १९१७ च्या चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी महात्मा गांधींशी त्यांचा परिचय वाढला. त्यांनी महात्मा गांधींच्या चतुःसूत्रीचा पुरस्कार केला आणि वकिली व्यवसाय सोडला. पाटण्यात त्यांनी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापून स्वदेशी, मद्यपानबंदी, खादीचा प्रसार इत्यादी कार्यक्रम हाती घेतले. बिहारमध्ये १९३४ साली फार मोठा भूकंप झाला. मदत समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अतोनात परिश्रम घेऊन ३८ लाख रुपयांचा भूकंप निधी जमा केला. प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी रात्रंदिवस गोरगरिबांसाठी काम केले. अशा या थोर नेत्याचे २८ फेब्रुवारी १९६३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -