Homeसंपादकीयदिन विशेषGadge Maharaj : स्वच्छतादूत संत गाडगे बाबा

Gadge Maharaj : स्वच्छतादूत संत गाडगे बाबा

Subscribe

संत गाडगे बाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. संत गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. गाडगे बाबा महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली. ते सामाजिक न्यायासाठी विविध गावांमध्ये भटकत असत. गाडगे महाराजांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांमध्ये जास्त रुची होती. २० व्या शतकातील समाज सुधारणांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

गाडगे बाबा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित, पीडितांच्या सेवेत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांचे कीर्तन लोकप्रबोधनाचा एक भाग असे. कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी परंपरांवर ते टीका करीत असत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देतानाच स्वच्छता-चारित्र्याची शिकवणही गाडगे बाबा देत असत. देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, शिक्षित व्हा, पोथी-पुराणे, मंत्रतंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, अशी शिकवण त्यांनी आयुष्यभर लोकांना दिली.

माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतून रंजल्या-गांजल्या, अनाथांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, विद्यालये सुरू केली. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीकाठी वलगाव (अमरावती) येथे गाडगे बाबा यांचा मृत्यू झाला.