Homeसंपादकीयदिन विशेषGajananrao Joshi : शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी

Gajananrao Joshi : शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी

Subscribe

गजानन अनंत जोशी हे प्रख्यात व्हायोलीनवादक व ग्वाल्हेर घराण्याचे नामवंत गायक होते. गजाननराव जोशी हे ‘गजाननबुवा जोशी’ म्हणून ओळखले जात. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1911 रोजी गिरगाव, मुंबई येथे झाला. त्यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी (अन्तुबुवा) यांना गायनाकरिता औंध संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली होती. ते औंध संस्थानचे राजगायकही होते. त्यांचे आजोबा मनोहरबुवा हेदेखील उत्तम गवई होते. अन्तुबुवांनी गिरगावला राहत्या घरी ‘श्रीगुरुसमर्थ गायनवादन विद्यालय’ सुरू केले होते.

त्यामुळे लहानग्या गजाननबुवांवर बालपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले होते. पुढे गजाननबुवांच्या वडिलांनी त्यांना घरीच गायनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडून ते तबला शिकले. यथावकाश त्यांनी रामकृष्णबुवा वझे (ग्वाल्हेर घराणा) आणि प्रौढवयात उस्ताद भूर्जीखाँ (जयपूर घराणा), उस्ताद विलायत हुसेनखाँ (आग्रा घराणा) यांच्याकडेही गाण्याची तालीम घेतली.

वयाच्या साधारण सोळाव्या वर्षापासून ते व्हायोलीनवादनाचे जाहीर कार्यक्रम करू लागले. 1928 पासून त्यांनी मुंबई आकाशवाणीवर गायन व व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एच.एम.व्ही. कंपनीने त्यांच्या व्हायोलीनवादनाची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. ही खूप गाजली. पुढे दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी सल्लागार म्हणून काम केले.

गजाननबुवा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातही प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. गजाननबुवांच्या अध्यक्षतेखाली औंधमध्ये ‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यांना 1972 मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, आयटीसी सन्मान (1982) व मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार (1985) लाभला. गजाननबुवांचे 28 जून 1987 रोजी डोंबिवली येथे निधन झाले.