Eco friendly bappa Competition
घर संपादकीय दिन विशेष आधुनिक कथांचे जनक गंगाधर गाडगीळ

आधुनिक कथांचे जनक गंगाधर गाडगीळ

Subscribe

गंगाधर गाडगीळ हे आधुनिक मराठी साहित्याचे जनक मानले जातात. त्यांनी कथा, कादंबरी, प्रवासवृत्त, समीक्षा, नाटक, बालसाहित्य, अर्थशास्त्रविषयक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांचा जन्म २५ ऑगस्ट १९२३ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी अर्थशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन एम. ए. केले. १९४६ पासून २५ वर्षे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.

महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी कथालेखनास प्रारंभ केला आणि एक नामवंत नवकथाकार म्हणून लौकिक मिळविला. ‘मानसचित्रे’ (१९४६), ‘कडू आणि गोड’ (१९४८), ‘नव्या वाटा’ (१९५०), ‘तलावातील चांदणे’ (१९५४), ‘पाळणा’ (१९६१) हे त्यांचे काही उल्लेखनीय कथासंग्रह. ‘वेगळे जग’ (१९५८), ‘गाडगीळांच्या कथा’ (१९५८) व ‘गुणाकार’ (१९६५) या संग्रहांत त्यांच्या निवडक कथा एकत्र केलेल्या आहेत. मराठी कथेला वेगळे वळण देण्यात गाडगीळांचा वाटा मोठा आहे.

- Advertisement -

मानवाचे बाह्यवर्तन आणि अंतर्गत भावविश्व यांमध्ये अनेक कारणांनी विसंगती निर्माण होते, याची जाण ठेवून त्याच्या अनपेक्षित, उठवळ व चमत्कारिक उक्तिकृतींमागील सूक्ष्म-तरल भावना व संवेदना आणि सुप्त मनातील संज्ञाप्रवाह यांचा गाडगीळांनी वेध घेतला. नवीन्यपूर्ण प्रतिमा व लवचिक, मार्मिक शब्दकळा यामुळे त्यांच्या कथांतील जीवनदर्शन कलात्मक झाले आहे. साचेबंद घटनाप्रवणता कमी करून मनोविश्लेषणावर भर देणारी जी नवकथा १९४५ पासून रूढ झाली, तिचे ते अध्वर्यू समजले जातात. मुंबईच्या तरुण कारकुनांच्या जीवनातील छोट्यामोठ्या विसंगती रंगविणारी ‘खरं सांगायचे म्हणजे’ (१९५४) आणि ‘बंडू’ (१९६१) ही पुस्तकेही त्यांच्या उपहासप्रचुर, खुसखुशीत व हलक्याफुलक्या विनोदनिर्मितीचा प्रत्यय देतात. अशा या प्रतिभावान साहित्यिकाचे १५ सप्टेंबर २००८ रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -