गंगाधर महांबरे हे चतुरस्त्र लेखक, कवी व गीतकार होते. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1931 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथे झाले. 1948 मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पुढे 1956 मध्ये पुणे विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. नोकरी करीत असतानाच त्यांनी मुक्त पत्रकारिता आणि लेखन सुरू केले होते. 1954 पासून केलेल्या गीतांमधील ध्वनिमुद्रित झालेली त्यांची अनेक भावगीते आजही लोकप्रिय आहेत. वृत्तपत्रे, मासिके, नभोवाणी, दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी कॅसेट्स इत्यादींसाठी त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांचे साहित्य नाटिका, बालसाहित्य, चरित्रे, गाण्यांचे संपादन आणि गीतसंग्रह अशा विविध प्रकारात आहे.
‘दिलजमाई’, ‘रंगपंचमी’, ‘सिंधुदुर्ग’, ‘कोल्हा आणि द्राक्षे’ अशा अनेक नाटिका. ‘देवदूत’, ‘संतांची कृपा’, ‘नजराणा’ ही नाटके. ‘गौतमबुद्ध’, ‘जादूचा वेल’, ‘जादूची नगरी’, ‘बेनहर’, ‘शुभम् करोती’, ‘किशोरनामा’, ‘मॉरिशसच्या लोककथा’ इत्यादी बालसाहित्याची पुस्तके. ‘वॉल्ट डिस्ने’, ‘चार्ली चॅप्लिन’, ‘भावगीतकार ज्ञानेश्वर’, अशी उपयुक्त पुस्तकेही त्यांनी लिहिली. या गद्यलेखनाबरोबर ‘आपली आवड’, ‘उष:काल’, ‘रसिका तुझ्याचसाठी’, ‘मराठी गझल’, ‘आनंदाचे डोही’ इत्यादी गीतसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांची गद्यलेखन शैली साधी, सरळ, प्रासादिक आहे आणि गीतांमध्ये सोपी रचना व शब्दांची अचूक निवड हे त्यांचे वैशिष्ठ्य आहे. त्यांच्या ‘मौलिक मराठी चित्रगीते’ या पुस्तकाला 2001 साली राष्ट्रपतींनी सुवर्णकमल देऊन राष्ट्रीय सन्मान केला आणि ‘ग्रामीण उद्योगाच्या यशस्वी वाटा’ ह्या पुस्तकाला 2008 सालचा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला. अशा या चतुरस्त्र लेखकाचे 23 डिसेंबर 2008 रोजी निधन झाले.
Gangadhar Mahambare : चतुरस्त्र लेखक गंगाधर महांबरे
written By My Mahanagar Team
Mumbai