गंगुबाई हनगल या किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचा जन्म ५ मार्च १९१३ रोजी धारवाड येथे झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे १९२४ मध्ये त्यांनी बेळगाव येथे महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल) काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले.
हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता. गंगुबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या बालपणापासून आईने त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण व संस्कार दिले.धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे लहान असतानाच त्यांनी काही काळ कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले. नंतर १९३८ मध्ये सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) या किराणा घराण्याच्या गायकांकडे त्यांची दीर्घकाळ संगीत-साधना झाली. तेथे त्यांना गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर यांची साथ मिळाली.
पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगुबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले. १९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने त्यांच्या ‘गांधारी’ या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६० ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले. अशा या थोर गायिकेचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले.