विल्यम कॅरी हे अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे पहिले इंग्रज पंडित, कोशकार, व्याकरणकार व भाषांतरकार होते. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १७६१ इंग्लंडमधील पोलेर्सपरी येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता आले नसले, तरी धार्मिक साहित्याचे त्यांनी विपुल वाचन केले. ११ नोव्हेंबर १७९३ रोजी ते कोलकाता येथे आले.
सुरुवातीस काही काळ त्यांनी माल्डा येथे शेती केली व नंतर मदनावती येथील निळीच्या कारखान्यात नोकरी धरली. मदनावती येथे फावल्या वेळात त्यांनी दुभाषी रामराम बसूंकडे बंगालीचा अभ्यास केला. यासंदर्भात संस्कृतचे महत्व जाणून संस्कृतचाही त्यांनी चांगला अभ्यास केला. याच सुमारास नापूरकर भोसल्यांचे वकील वेणीरामपंत यांचे आश्रित वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने त्यांनी मराठीचाही अभ्यास केला. १७९९ मध्ये त्यांची नोकरी सुटली.
४ मे १८०० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. एप्रिल १८०१ मध्ये कॅरींची या कॉलेजात संस्कृत, बंगाली व मराठीचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. मृत्युंजय विद्यालंकार, रामराम बसू व वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने कॅरींनी आधुनिक बंगाली गद्याचा व मराठी गद्याचा तसेच या भाषांतील मुद्रणव्यवसायाचा पाया घातला. फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये असताना कॅरींनी १८१५ ते १८२५ या काळात बंगाली शब्दकोश तीन खंडात (८०,००० शब्द) प्रसिद्ध केला. याशिवाय त्यांनी ‘कथोपकथन’ (१८०१) आणि ‘इतिहासमाला’ (१८१२) ही बंगाली पुस्तके, तसेच ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज (१८०५) व डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज (१८१०) हे ग्रंथ तयार करुन प्रसिद्ध केले. अशा या महान व्याकरणकाराचे ९ जून १८३४ रोजी निधन झाले.