Homeसंपादकीयदिन विशेषश्रेष्ठ अर्थतज्ञ चिंतामणराव देशमुख

श्रेष्ठ अर्थतज्ञ चिंतामणराव देशमुख

Subscribe

चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे नामवंत अर्थतज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. त्यांचा जन्म १४ जानेवारी १८९६ रोजी कुलाबा जिल्ह्यातील नाते या गावी झाला. त्यांचे वडील वकील होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाते या गावी झाले. मुंबई येथे ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’ च्या माध्यमिक शाळेतून ते मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले (१९१२). एल्फिन्स्टन महाविद्यालयातून इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते इंग्लंडला गेले व केंब्रिजच्या ‘जीझस महाविद्यालया’ तून बी. ए. झाले.

सी.डी. देशमुख यांनी ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ची स्थापना केली. ते या संस्थेचे अध्यक्ष होते. १९५७ ते १९६० या कालावधीत ते ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे मानद अध्यक्ष झाले. १९६३-६४ या वर्षी दिल्लीच्या भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेचे आणि १९६५ ते १९७४ या कालावधीत ते आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष होते. १९५९ ते १९७३ या कालावधीत देशमुख हैदराबादच्या प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख या ‘आंध्र महिला सभा’ या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष होत्या.

१९४४ मध्ये ब्रिटिश सरकारने ‘सर’ किताब देऊन त्यांचा सत्कार केला. १९५९ मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे फाऊंडेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९७५ मध्ये भारत सरकारने देशमुख यांना ‘पद्मविभूषण’ देऊन गौरविले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रशासकीय, वित्तीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनमोल कार्य केले. सी.डी. देशमुख यांचे २ ऑक्टोबर, १९८२ रोजी निधन झाले.