दगडू मारुती पवार उर्फ दया पवार हे मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३५ रोजी अहमदनगरमधील धामणगाव येथे झाला. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. १९५६ मध्ये मुंबईतील पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी लेखनिक व प्रयोगशाळा सहायक म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९६७ मध्ये अस्मितादर्शमध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. दलित साहित्य चळवळीच्या कार्यात १९६८पासून त्यांचा सक्रिय सहभाग होता.
१९६९ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान मुखपत्रात त्यांचा दलित साहित्यावर लिहिलेला लेख पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. श्रीलंकेत कोलंबोमध्ये १९७५ला भरलेल्या जागतिक बुद्ध परिषदेलाही ते हजर होते. दया पवार यांनी विपुल लिखाण केले. त्यांपैकी ‘बलुतं’ हे १९७८मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. दलित जीवनाची एक वेगळी ओळख त्यांनी यातून करून दिली. १९७९मध्ये राज्य शासनाचा पुरस्कारही बलुतंला मिळाला. त्या आधी ‘कोंडवाडा’ (१९७४) या त्यांच्या काव्यसंग्रहालाही १९७५ मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
याशिवाय ‘विटाळ’ कथासंग्रह (१९८३), ‘बलुतं एक वादळ’ (१९८३), ‘चावडी’ स्फुटलेख (१९८३), ‘पासंग’(१९९३) व ‘जागल्या’ स्तंभलेखन, ‘पाणी कुठंवर आलं गं बाई’ काव्यसंग्रह, ‘कल्लपा यशवंत ढाले यांची डायरी’ (१९८४), ‘धम्मपद’ पाली भाषेतील धम्मपदांचा मराठी अनुवाद (१९९१) असे आजवर त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झाले. १९९४-९५मध्ये ते परिवर्तन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. भारत सरकारने दया पवार यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे. अशा या थोर साहित्यिकाचे २० सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.