हरी नारायण आपटे हे मराठीतील सामाजिक व ऐतिहासिक विषयातील एक नामवंत कादंबरीकार होते. त्यांचा जन्म ८ मार्च १८६४ रोजी जळगाव जिल्ह्यातील पारोळे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई व पुणे येथे झाले. ‘मधली स्थिति’ (१८८८) ही त्यांची पहिली समाजिक कादंबरी आहे. या कादंबरीखेरीज त्यांनी इतर नऊ सामाजिक कादंबर्या लिहिल्या आहेत. पण लक्ष्यात कोण घेतो?, जग हे असे आहे, यशवंतराव खरे, मी, गणपतराव, कर्मयोग, आजच, मायेचा बाजार आणि भयंकर दिव्य या त्या कादंबर्या होत.
म्हैसूरचा वाघ ही त्यांनी लिहिलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी. त्यानंतर गड आला पण सिंह गेला, चंद्रगुप्त, रूपनगरची राजकन्या, वज्राघात, सूर्योदय, केवळ स्वराज्यासाठी, सूर्यग्रहण, कालकूट, मध्यान्ह आणि उषःकाल अशा आणखी दहा ऐतिहासिक कादंबर्या त्यांनी लिहिल्या. ज्ञानप्रकाश, सुधारक, मनोरंजन आणि निबंधचंद्रिका या इतर नियतकालिकांस त्यांनी भरीव सहकार्य दिले होते.
संत सखूबाई, सती पिंगला ही त्यांची स्वतंत्र नाटके. याशिवाय व्हिक्टर हयूगो, काँग्रीव्ह, शेक्सपिअर, मोल्येर यांच्या नाट्यकृतींची त्यांनी रूपांतरे केली. ‘मराठी वाङ्मयाचा अभ्यास’ व ‘विदग्ध वाङ्मय’ या विषयांवर त्यांनी दिलेली व्याख्याने प्रसिद्ध झाली आहेत. मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या भाषाशास्त्रविषयक व्याख्यानमालेत ‘मराठी: इट्स सोअर्सिस अँड डेव्हलपमेंट’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले होते. त्यांचा शेक्सपिअरचा व्यासंग मोठा होता.
त्यांनी लिहिलेले शेक्सपिअरविषयक लेख निबंधचंद्रिकेतून प्रसिद्ध झाले होते. अकोला येथे १९१२ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विपुल साहित्यनिर्मितीबरोबरच त्यांनी लक्षणीय स्वरूपाची समाजसेवा केली. पुण्याचे ‘नूतन मराठी विद्यालय’ आणि ‘किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल’ यांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. हरी नारायण आपटे यांचे ३ मार्च १९१९ रोजी निधन झाले.