इतिहास संशोधक रामकृष्ण भांडारकर

रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा आज स्मृतिदिन. रामकृष्ण भांडारकर हे थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की तथापि त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून ‘भांडारकर’ हे नाव पडले. त्यांचा जन्म ६ जुलै १८३७ रोजी मालवण याठिकाणी झाला. मालवण, राजापूर व रत्नागिरी येथे आरंभीचे काही शिक्षण घेतल्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून हायस्कूलची परीक्षा ते उत्तीर्ण झाले (१८५४) व नंतर त्या इन्स्टिट्यूट कॉलेजचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला (१८५८). पुढे मुंबई विद्यापीठाचे बी.ए.(१८६२) व एम. ए. (१८६३) या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मुंबई व पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्री पंडितांजवळ न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादींचा चांगला अभ्यास केला. हैदराबाद (सिंध) व रत्नागिरी येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके तयार केली.

भांडरकरांनी संस्कृतच्या या अध्ययनाला नवे चिकित्सक व निःपक्षपाती संशोधनाचे स्वरूप दिले. १८७४ साली लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत नाशिक शिलालेखासंबंधी त्यांचा निबंध वाचला गेला. १८८५ मध्ये जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पीएच. डी. अर्पण केली. १८८६ साली व्हिएन्ना येथे ‘क्राँग्रेस ऑफ ओरिएंटॅलिस्टस’ भरली, तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले.

मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये १८७९ पर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठचे अधिछात्र व सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजाविल्यानंतर ते कुलगुरु झाले. अनेक संस्कृत हस्तलिखितांसंबंधी त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिले. त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली. स्त्रिया, शुद्रातिशुद्र यांचे शिक्षण, बालविवाहप्रतिबंध, विधवाविवाह, संमतिवयाचा पुरस्कार, अस्पृश्यतानिवारण, मद्यपानबंदी, देवदासीपद्धतबंदी इ. सामाजिक सुधारणा व्हाव्यात म्हणून भांडारकरांनी अविरत श्रम केले. अशा अभ्यासू इतिहास संशोधकाचे २४ ऑगस्ट १९२५ रोजी निधन झाले.