मिहिर सेन हे इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू होते. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३० रोजी पुरुलिया (प. बंगाल) येथे झाला. त्यांचे वडील कटक येथे डॉक्टर होते. मिहिर सेन हे कायद्याचे पदवीधर होते. व्यवसायाने ते वकील होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी एका महिला जलतरणपटूबद्दल वाचलं. जिने इंग्लिश खाडी पोहून पार केली होती.
त्या महिलेबद्दल वाचल्यानंतर ते इतके प्रेरित झाले की त्यांनी इंग्लिश खाडी पार करायचा निर्णय घेतला. एक यशस्वी, प्रसिद्ध आणि सर्वश्रेष्ठ जलतरणपटू बनण्याचा त्यांचा प्रवास इथून सुरू झाला. त्यांनी एकाच कॅलेंडर वर्षात जगभरातल्या पाचही खंडाच्या समुद्रात पोहण्याचा विक्रम स्वत:च्या नावे करून घेतला. असं करणारे ते पहिले भारतीय आणि आशियातील व्यक्ती बनले होते.
१२ सप्टेंबर १९६६ साली त्यांनी ‘डारडेनेल्स’ पोहून पार केला. असे करणारे ते जगातले पहिले व्यक्ती होते. यानंतर फक्त ९ दिवसांनंतर २१ सप्टेंबरला वास्फोरस पोहून पार केला. २९ ऑक्टोबर १९६६ च्या दिवशी त्यांनी ‘पनामा कॅनेल’ पोहून पार करायला सुरुवात केली.
३४ तास १५ मिनिटं पोहून त्यांनी हा विक्रमही स्वत:च्या नावे करून घेतला. मिहिर यांनी एकूण ६०० किलोमीटर लांबी पोहून पार केली. मिहिर सेन यांचा भारत सरकारनं १९५९ साली ‘पद्मश्री’ पुरस्कार, तर १९६७ साली ‘पद्मभूषण’ देऊन सन्मान केला. कोलकाता येथे ११ जून १९९७ रोजी मिहिर सेन यांचे निधन झाले.