गॅलिलिओ गॅलिली हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता. त्याचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे.
वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही. १५८३ साली, गॅलेलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक ‘ब्रेनवेव्ह’ आली. झोका लहान असो व मोठा किंवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला.
‘दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो’ हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्याने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती. याच लंबकाचा वापर गॅलेलिओने त्याचे ‘गतीचे नियम’ मांडण्यासाठी केला आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो ‘गॅलिलियोचा दिवा’ म्हणून ओळखला जातो.
१६०९ साली गॅलेलिओला वाटले की, ‘दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर?’ आणि गॅलेलियोने ती दुर्बीण आकाशाकडे वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले. १६१० साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. ८ जानेवारी १६४२ रोजी गॅलिलिओचे निधन झाले.