जॉन गॉल्झवर्दी हा ब्रिटिश कादंबरीकार आणि नाटककार होता. त्याचा जन्म 14 ऑगस्ट 1867 रोजी किंग्स्टन हिल, सरी येथे झाला. तर शिक्षण ऑक्सफर्डला झाले. तो 1890 मध्ये वकील झाला. नाविक कायद्याचा विशेष अभ्यास करण्यासाठी तो जलपर्यटनास निघाला. या प्रवासात जोसेफ कॉनरॅड या विख्यात अँग्लो-पोलिश कादंबरीकाराशी त्याचा परिचय झाला आणि ते निकटचे मित्र बनले. वकिलीमध्ये रस न वाटल्याने गॉल्झवर्दीने स्वत:ला लेखनास वाहून घेतले.
द आयलंड फॅरिसीज (1904) हे गॉल्झवर्दीच्या नावावर प्रसिद्ध झालेले पहिले पुस्तक होय. द फॉरसाइट सागा या कादंबरीमालेवर गॉल्झवर्दीची कीर्ती मुख्यत: अधिष्ठित आहे. या कादंबरीमालेतील कादंबर्या पुढीलप्रमाणे : द मॅन ऑफ प्रॉपर्टी, इन चान्सरी आणि टु लेट इंडियन समर ऑफ अ फॉरसाइट आणि अवेकनिंग हे अनुक्रमे मॅन ऑफ प्रॉपर्टी आणि इन चान्सरी या कादंबर्यांना जोडलेले इंटरल्यूड्स होत.
पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात फॉरसाइट घराण्याची कथा गॉल्झवर्दीने पुढील कादंबर्यांतून पुढे नेली : द व्हाइट मंकी, द सिल्व्हर स्पून आणि स्वॉन साँग, अ सायलेंट वूइंग आणि पासर्स बाय हे अनुक्रमे द व्हाइट मंकी आणि द सिल्व्हर स्पून या कादंबर्यांचे इंटरल्यूड्स होत.
या कादंबर्या अ मॉडर्न कॉमेडी या नावाने 1929 मध्ये एकत्रित स्वरूपात प्रसिद्ध झाल्या. द सिल्व्हर बॉक्स, स्ट्राइफ, जस्टिस आणि लॉयल्टीज ही त्याने लिहिलेल्या नाटकांपैकी काही विशेष उल्लेखनीय नाटके. 1932 सालचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. जॉन गॉल्झवर्दी याचे 31 जानेवारी 1933 रोजी हॅम्पस्टेड येथे निधन झाले.