कोदेंदेरा मडप्पा करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख होते. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1899 रोजी कर्नाटकातील मरकारा (कूर्ग) येथे झाला. 1917 मध्ये मडिकेरी येथील सेंट्रल हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये घेतले. क्वेटा येथील स्टाफ कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते.
दुसर्या महायुद्धात इराक, सिरिया आणि इराण, तसेच ब्रह्मदेशातील आराकान येथील लष्करी मोहिमांत ते सहभागी होते. स्वंतत्र भारतात सेनाप्रमुख म्हणून 1949-53 या काळात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. नेपाळच्या राजाने आपल्या लष्करात मानसेवी जनरलचा हुद्दाही त्यांना दिला होता. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. अनेक क्रीडासंस्था आणि निवृत्त सैनिकांच्या संस्था यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.
1947 मध्ये, ते इंपीरियल डिफेन्स कॉलेज, कॅम्बर्ली, यूके येथे प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी निवडलेले पहिले भारतीय ठरले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, त्यांची मेजर जनरलच्या रँकसह जनरल स्टाफचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना ते पूर्व आर्मी कमांडर आणि जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न कमांड बनले.
करिअप्पा यांची 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रुमन यांनी ‘ऑर्डर ऑफ द चीफ कमांडर ऑफ द लीजन ऑफ मेरिट’ हा पुरस्कार प्रदान केला. भारत सरकारने 1986 मध्ये करिअप्पा यांना फील्ड मार्शलचा दर्जा बहाल केला. के. एम. करिअप्पा यांचे 15 मे 1993 रोजी बंगळुरू येथे निधन झाले.