घर संपादकीय दिन विशेष कायदे पंडित काशिनाथ तेलंग

कायदे पंडित काशिनाथ तेलंग

Subscribe

काशिनाथ त्र्यंबक तेलंग हे प्राच्यविद्या संशोधक, कायदेपंडित, सुधारक आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १८५० रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी ते मॅट्रिक झाले. मॅट्रिकला संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण होणारे ते पहिले विद्यार्थी होत. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश केला. १८६८ मध्ये बी. ए. झाले. १८६९च्या शेवटी ते एम. ए. झाले. एम.ए. करतानाच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. नेहमीच प्रथम क्रमांक राहिल्यामुळे त्यांना अनेक शिष्यवृत्त्या व बक्षिसे मिळाली.

पुढे ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात अधिछात्र होते. नंतर त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. पुढे १८८९ मध्ये उच्च न्यायालयात त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. हिंदू कायद्यातील सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला. संमतीवयाच्या कायद्यास त्यांची मान्यता होती. मुंबईला काँग्रेस स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. काँग्रेसचे ते १८८५-८९ पर्यंत चिटणीस होते. पहिल्या अधिवेशनापासून त्यांनी महत्त्वाच्या ठरावावर भाषणे केली. १८९२ साली त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.

- Advertisement -

कायद्याप्रमाणेच इतिहास, राज्यशास्त्र, भाषासाहित्य या विषयांचा त्यांचा व्यासंग मोठा होता. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते, तर फ्रेंच, जर्मन या भाषाही त्यांना अवगत होत्या. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. मराठी भाषा व मराठी वाङ्मय यांच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळाची स्थापना केली. अशा या महान कायदे पंडिताचे १ सप्टेंबर १८९३ रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -