Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयदिन विशेषLuther Burbank : वनस्पतीशास्त्रज्ञ ल्यूथर बरबँक

Luther Burbank : वनस्पतीशास्त्रज्ञ ल्यूथर बरबँक

Subscribe

ल्यूथर बरबँक हे वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ७ मार्च १८४९ रोजी अमेरिकेतील लँकेस्टर, मॅसॅच्युसेट्स येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण थोडेच झाले, परंतु लहान वयातच त्यांनी निसर्ग आणि यांत्रिकी विषयात अधिक रस दर्शविला. त्यांनी आपले वैज्ञानिक ज्ञान लँकेस्टर अकादमीत असताना तेथील सार्वजनिक वाचनालयात वाचन करून मिळवले. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी छोटे शेत विकत घेऊन बागकाम करण्यास सुरुवात केली आणि स्थानिक बाजारात भाज्या, फळे विक्री करण्यात ते गुंतले.

बरबँक यांचे काका बोस्टन संग्रहालयाचे प्रमुख होते. बरबँकच्या निसर्ग प्रेमास आणि उत्साहास त्यांच्या काकांचे प्रोत्साहन लाभले. त्यांच्या स्वत:च्या मते, प्राणी आणि वनस्पतीचे संगोपन (डोमेस्टिकेशन) करत असताना त्यांच्यात घडून येणारी अंतर्गत तफावत यावरील चार्ल्स डार्विनचा फरक सिद्धांत १८६८ मध्ये त्यांच्या वाचनात आला.

या सिद्धांताच्या वाचनानंतर बरबँक यांनी असे निर्धारित केले की नैसर्गिक निवडीतून चांगल्या वनस्पतीची निर्मिती होऊ शकते आणि संकरापासून किंवा मिश्रजातीय वनस्पती निर्मितीच्या माध्यमातून नवीन वाण विकसित होऊ शकते. या विचाराने प्रभावित होऊन वनस्पतीच्या नवीन प्रजातीचे उत्पादन करणे हे त्यांनी स्वत:साठी जीवनकार्य ठरविले. त्यांनी आपले पहिले बटाटा पिकाचे यशस्वी रोप निवड पद्धतीद्वारे विकसित केले.

या संशोधनाचे हक्क विकून त्यांना जे पैसे मिळाले त्याचा उपयोग त्यांनी कॅलिफोर्नियातील सांता रोजा येथे एक प्रायोगिक शेत, हरितगृह आणि रोपवाटिका स्थापन करण्यात गुंतविले. या कार्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत आमूलाग्र बदल घडवून आला आणि प्रसिद्धी मिळाली. सांता रोजा येथील हेच क्षेत्र पुढे भरभराटीस येऊन पिकाच्या नवीन वाणाचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध झाले. अशा या महान वनस्पतीतज्ज्ञाचे ११ एप्रिल १९२६ रोजी निधन झाले.