घरसंपादकीयदिन विशेषइंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर

इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर

Subscribe

मल्हारराव होळकर यांचा आज स्मृतिदिन. मल्हारराव होळकर हे मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी होळ (जेजुरीजवळ) येथे झाला. त्यांचे वडील खंडूजी हे शेतकरी व चौगुला-वतनदार होते. मल्हारराव ३ वर्षांचे असतानाच वडील वारल्यामुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे भोजराज बार्गल या भावाकडे गेली. भोजराजने आपला पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय बाजूला ठेवून एक पथक उभे केले होते.

तो कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होता. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली. १७२० मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोडदळात घेतले (१७२१). त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. मल्हाररावांस खानदेशच्या भूमीची चांगली जाण होती. बाजीरावांनी १७२५ मध्ये मल्हाररावांना पाचशे घोडेस्वारांचे मुख्य नेमून त्यांच्याकडे उत्तर खानदेशची कामगिरी दिली.

- Advertisement -

तसेच माळवा प्रांतातील चौथ आणि सरदेशमुखी जमा करण्याची जबाबदारीही सोपविली. बाजीराव पेशव्यांच्या हाताखाली शिंदे व धारचे पवार यांसारखेच मल्हारराव हे पेशव्यांतर्फे इंदूर संस्थानचे अधिपती झाले. १७४५ मध्ये म्हणजे अवघ्या २० वर्षांतच मल्हाररावांकडे साडेचौर्‍याहत्तर लाखांचा मुलूख देण्यात आला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार होऊन मराठी राज्याचे साम्राज्य निर्माण झाले. मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढायांमध्ये भाग घेतला. मल्हाररावांनी १७३५-३८ दरम्यान नानासाहेब पेशव्यांबरोबर भोपाळ, गुजरात, अंतर्वेदी, दिल्ली, कोकण, वसई व आग्रा या ठिकाणी झालेल्या युद्धांत पराक्रम केला. अशा या पराक्रमी योद्ध्याचे २० मे १७६६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -